Revati Lele: मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या लग्न, साखरपुडे आणि नव्या नात्यांची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. लग्नसराईच्या या वातावरणात अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले हिने तिच्या नव्या नात्याची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
रेवती लेले, जी ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील मधु आणि ‘कोण होतीस तू, काय झालेस तू’ मालिकेतील अमृता या भूमिकांसाठी ओळखली जाते, तिने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये एका हातात पुष्पगुच्छ आणि दुसऱ्या हाताच्या बोटात अंगठी घातलेली दिसते. विशेष म्हणजे एका फोटोमध्ये तिच्या हातामागे तिचा होणारा जोडीदार दिसत असला, तरी त्याचा चेहरा स्पष्ट दाखवलेला नाही. त्यामुळे “तो नक्की कोण?” अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.
या फोटोसोबत रेवतीने लिहिलेलं कॅप्शन मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. “मी होकार द्यायच्या आधीच माझ्या मनाने होकार दिला होता,” असे शब्द तिने लिहिले असून, तिच्या भावनांची प्रामाणिक झलक या ओळीतून दिसून येते. या पोस्टनंतर रेवतीच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील कलाकारांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रेवतीच्या या आनंदाच्या क्षणावर तिच्या सहकलाकारांनी खास प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “लबाड… खूप खूप अभिनंदन! पार्टी करूया आता,” अशी मजेशीर कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केली. अभिनेत्री गिरीजा प्रभू, मधुरा जोशी, साक्षी गांधी, अभिषेक रहाळकर, गौरी कुलकर्णी, समृद्धी केळकर, अनघा अतुल, दिव्या पुगावकर, मोनिका चव्हाण आणि पूर्णिमा डे यांसारख्या अनेक कलाकारांनीही रेवतीला शुभेच्छा दिल्या.
रेवती लेलेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, ती यापूर्वी अभिनेता आदेश वैद्यसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. जवळपास सहा वर्षांचे नाते अचानक संपल्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. त्या कठीण काळानंतर आता रेवतीने आयुष्यात नवी सुरुवात केली असून, तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद चाहत्यांनाही भावत आहे.
सध्या रेवतीने तिच्या होणाऱ्या जोडीदाराची ओळख उघड न केली असली, तरी लवकरच ती या नात्याबाबत अधिक खुलासा करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. एकूणच, रेवती लेलेच्या या नव्या प्रेमकथेमुळे मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा प्रेमाची आणि आनंदाची चर्चा रंगली आहे.