Atharva Sudame: अथर्व सुदामेला दिलासा नाहीच! PMP प्रशासनाने उचलले कठोर पाऊल ; लेखी खुलासा न मिळाल्यामुळे ठोठावला तब्बल इतक्या रुपयांचा दंड

पीएमपी बसमध्ये परवानगीशिवाय रिल शूट केल्याप्रकरणी रिल्सस्टार अथर्व सुदामेला प्रशासनाकडून दंड ठोठावण्यात आला.

Atharva Sudame: अथर्व सुदामेला दिलासा नाहीच! PMP प्रशासनाने उचलले कठोर पाऊल ; लेखी खुलासा न मिळाल्यामुळे ठोठावला तब्बल इतक्या रुपयांचा दंड

Atharva Sudame: सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या रिल्सस्टार अथर्व सुदामेसाठी अडचणी वाढल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) त्याच्यावर थेट 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, ही रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता चित्रीकरण केल्याचा आरोप PMP प्रशासनाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व सुदामेने PMPच्या बसमध्ये कंडक्टरच्या पोशाखात रिल तयार केला होता. हा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. रिलचा उद्देश मनोरंजनाचा असल्याचं सांगितलं जात असलं, तरी प्रशासनाच्या मते या कृतीमुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाली असून प्रवाशांना अपमानास्पद पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.

या प्रकरणात PMP प्रशासनाने आधी दोन वेळा नोटीस पाठवून अथर्वला आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र ठरावीक कालावधीत कोणताही लेखी खुलासा न मिळाल्यामुळे प्रशासनाने तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली आहे. यामध्ये दंडाची रक्कम तात्काळ भरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, PMPच्या मालकीच्या बस, गणवेश, ई-मशीन, बॅज आणि इतर अधिकृत साहित्याचा वापर करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते. नियमांचे उल्लंघन करून चित्रीकरण करणं हा गंभीर प्रकार असून, यामुळे कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

नवीन नोटीसमध्ये दोन रिल्ससाठी प्रत्येकी 25 हजार रुपये असा एकूण 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच ही रक्कम जमा न केल्यास भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार एफआयआर दाखल केली जाईल, असाही स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही जण PMP प्रशासनाच्या भूमिकेचं समर्थन करत असून सार्वजनिक मालमत्तेचा वापर करताना नियम पाळणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त करत आहेत. तर काहीजण अथर्वने केवळ मनोरंजनासाठी रिल बनवली होती, अशी बाजू घेताना दिसत आहेत.

दरम्यान, अथर्व सुदामेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तो दंड भरणार की कायदेशीर लढा देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही घटना सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी एक इशाराच मानली जात असून, व्हायरल कंटेंटच्या नादात नियमांकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं, हे यातून स्पष्ट होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number