मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंगमुळे जम्मू-काश्मीरमध्ये अस्थितरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. येथे हिंदू, काश्मिरी पंडितांच्या तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. रझा अकादमीने काश्मिरी पंडितांच्या बाजूने उभी राहिली असून मुंबईतील मिनारा मशिदीसमोर अकादमीतर्फे निदर्शने करण्यात आली. रझा अकादमीने जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हत्यांच्या विरोधात आंदोलन केले यावेळी रझा अकादमीचे कार्यकर्ते तसेच अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार थांबवा ‘काश्मीरमध्ये जो अत्याचार सुरु आहे, तो थांबला पाहिजे. अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करायला हवी,” अशा आशयाचे फलक निदर्शकांच्या हातामध्ये होते.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हत्यासत्राचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. हा अन्याय थांबवण्यात यावा अशी प्रतिक्रिया नेतेमंडळींकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील ही हिंसा थावण्यात यावी. काश्मिरी पंडितांची शक्य होईल तेवढी मदत करु, असे आश्वासन दिले आहे
महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल.