Randeep Hooda: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लायशराम यांच्या आयुष्यात आनंदाची नवी चाहूल लागली आहे. या दाम्पत्याने आपल्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले असून त्यांना गोंडस मुलगी झाली आहे. सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत रणदीपने चाहत्यांसोबत हा खास क्षण साजरा केला. या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचा जन्म हा कुटुंबासाठी अधिकच खास ठरला आहे. कारण नवजात मुलीचा वाढदिवस हा रणदीपच्या वडिलांच्या वाढदिवशीच आला आहे. त्यामुळे घरात एकाच दिवशी दोन आनंदाचे प्रसंग साजरे होत आहेत. या खास योगायोगामुळे रणदीपने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
रणदीप आणि लिन यांनी आपल्या मुलीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटोमध्ये बाळाचे छोटेसे हात दिसत असून चाहत्यांना नव्या कुटुंब सदस्याची गोड झलक पाहायला मिळाली. या पोस्टसोबत रणदीपने भावनिक संदेशही लिहिला आहे. वडील झाल्याचा आनंद व्यक्त करत त्याने आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि पत्नी लिनचे विशेष आभार मानले. “आज मी बाबा झालो आहे आणि त्यामुळे माझ्या वडिलांविषयीचा आदर आणखी वाढला आहे,” असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले.
या घोषणेपूर्वी काही दिवसांपूर्वीच रणदीप आणि लिन यांनी त्यांच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता त्यांच्या आयुष्यात आलेल्या या नव्या पाहुण्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.रणदीप हुड्डा आणि लिन लायशराम यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचे झाले तर दोघांची ओळख थिएटरच्या दिवसांत झाली होती. प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मोटली’ या थिएटर ग्रुपमध्ये काम करताना त्यांची भेट झाली. सुरुवातीला मैत्री असलेले हे नाते हळूहळू प्रेमात बदलले आणि अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या जोडीने २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरमधील इंफाळ येथे पारंपरिक मैतेई पद्धतीने लग्न केले होते. या विवाह सोहळ्यानेही मोठे लक्ष वेधून घेतले होते. लग्नानंतर आता त्यांच्या आयुष्यात मुलीच्या रूपाने नवा आनंद आला आहे.लिन लायशराम ही अभिनेत्री आणि मॉडेल असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मेरी कॉम’, ‘रंगून’, ‘कैदी बँड’ आणि ‘अॅक्सोन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. रणदीप आणि लिन यांच्या घरी आलेल्या या नव्या पाहुण्यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण या दाम्पत्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत