नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण' चित्रपटाचा नवा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. रणबीर कपूर आणि यश यांच्या दमदार उपस्थितीने ट्रेलरची चर्चा रंगली असली, तरी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते सनी देओल यांच्या अनुपस्थितीने. भगवान हनुमानाची भूमिका साकारणारे सनी देओल ट्रेलरमध्ये एकदाही दिसले नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुमारे 4 मिनिटे 10 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटातील अनेक महत्त्वाच्या पात्रांची झलक दाखवण्यात आली आहे. मात्र, हनुमानाच्या भूमिकेत असलेल्या सनी देओल यांचा साधा लूकही उघड करण्यात आलेला नाही. यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
चित्रपटाच्या टीझरपासून आतापर्यंत निर्मात्यांनी अनेक कलाकारांचे लूक आणि पात्रांची माहिती उघड केली आहे. मात्र, सनी देओल यांच्या भूमिकेबाबत अद्यापही गोपनीयता कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या हनुमान अवताराची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी 'हनुमान'च्या भूमिकेतील सनी देओल यांचा लूक तातडीने प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. काहींनी तर, ट्रेलरमध्ये त्यांची झलक असती तर त्याचा प्रभाव आणखी वाढला असता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, निर्माते सनी देओल यांचा लूक अद्याप गुप्त का ठेवत आहेत, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे आता चित्रपटाच्या पुढील प्रमोशनमध्ये हनुमानाच्या भूमिकेतील त्यांचा पहिला लूक कधी समोर येणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.