पुण्यामध्ये कसबा येथे मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज जाहीर सभा झाली. या सभेतही त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
पुरामुळे लोकांची घरं वाहून गेली, आणि सरकार प्रचारामध्ये मग्न होतं.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचा एक मंत्रीच कोथरुडपर्यंत वाहत आला.
सव्वाशे वर्ष मराठेशाहीने संपूर्ण भूप्रदेशावर राज्य केलं होतं पण आपला इतिहास पोहचवला जात नाही.
त्या वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार सरकारने करायचा असतो.
पण हे सरकार पुतळ्यांची स्मारकं करण्याच्या घोषणेत मश्गुल आहेत.
गुजरातमध्ये 3000 कोटी रुपये खर्चून सरदार पटेल यांचा पुतळाही उभा राहिला.
अमोल यादव नावाच्या एका तरुणाने विमान बनवलं. नंतर त्याने ते मुख्यमंत्र्यांना दाखवलं. त्याला आश्वासन दिलं गेलं की ‘ठाण्यात जमीन उपलब्ध करून देतो.’ वास्तवात जमीन दिली नाही. अखेर तो मुलगा सरकारी दिरंगाईला कंटाळून अमेरिकेत गेला. हेच तुमचं ‘मेक इन महाराष्ट्र’?
ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे कि, ‘माझी नोकरी कधीही जाऊ शकते’. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी.
बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो.
सरकारने घोषणा केली होती कि ‘100 स्मार्टसिटी घडवणार’. काय झालं त्या योजनेचं? शहरात भरलेलं पाणी म्हणजे स्मार्ट सिटी का? कि वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी?
ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का?
पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता?