धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना वाहतुकीमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर शेतांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस जीवदान देणारा ठरला आहे. कापसाला या पावसाचा सर्वाधिक लाभ झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये धुळे साक्री या तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे, तर शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यांमध्ये देखील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे .असे असले तरी जिल्ह्यातील खलाणे, चिमठाणे, निमगुळ या भागामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जमिनीतली ओल खोलवर न गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या प्रेरणा अद्यापही खोळंबल्या आहेत.
धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा होती. एकीकडं राज्यात मुसळधार पाऊस सुरु असताना दुसरीकडं मात्र धुळे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची हजेरी लागत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर चांगला पाऊस झाल्यानं शेतीकामांना वेग आला आहे. काही ठिकाणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तर दुसरीकडे मात्र कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पावसासोबत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा देखील सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामेहोणे अपेक्षित असताना देखील महापालिकेकडून ही कामं पूर्ण न झाल्यानं शहराच्या विविध भागातील रस्त्यांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.याचा परिणाम कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.