उमेश कोल्हे हत्या प्रकरणामुळे अमरावती सध्या चर्चेत आहे. पोलिसांनी अचलपूर आणि परतवाडामध्ये जमावबंदी लागू केली आहे. अमरावती जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर परतवाडा शहरात आज पुन्हा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण आणि जयपूर येथील कन्हैयालाल यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज शक्ती फाउंडेशनच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शहरातील काही भागांत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे. यामध्ये शहरातील ज्येष्ठ चौक, दुरानी चौक, पेन्शनपुरा महावीर चौक, संभाजी चौक लालपुर या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. दरम्यान, उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा)कडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी एनआयएकडे पथक अमरावतीमध्ये दाखल झाले आहे. तर उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.
उमेश कोल्हे यांची हत्याप्रकरणी अमरावती शहरात सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तर दुसरीकडे अमरावतीच्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या अचलपूर परतवाडा येथे देखील स्थानिक भाजपाच्या वतीने जयस्तंभ चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली . २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याच बरोबर उमेश कोल्हे यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली.