भारतीय जनता पक्षाचा गुरुवारी 44वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भाजपा नेते, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजपा पक्ष विकासाचा पर्याय असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले. तसेच, बजरंगबली हे भाजपाचे प्रेरणास्त्रोत आहे. बजरंगबलीप्रमाणे भाजपादेखील शक्तीशाली होतोय, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना देशभरातील जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण संपूर्ण देशात हनुमान जयंती साजरी करत आहोत. भगवान हनुमानजींचे जीवन भारताच्या विकासाच्या प्रवासात प्रेरणादायी आहे. त्या महान शक्तीचा आशीर्वाद आपल्या यशातून दिसत आहे. बजरंगबली हे शक्तीशाली आहेत. त्याचप्रमाणे भाजपादेखील शक्तीशाली होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आज भारत मोठ्या संकटाचा सामना करत आहे. समुद्रासारख्या आव्हानांवर मात करण्यास भारत अधिक सक्षम झाला आहे, असे ते म्हणाले. यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसमध्ये वंशवाद असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. तर, भाजपा वंशवादाविरोधात असून पक्षसंघटनेसाठी समर्पण आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशातील नागरिकांचा भाजपाला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपा पक्ष विकासाचा पर्याय असल्याचे ते म्हणाले.