Food Poisoning: चिमुरड्यांच्या जिवाशी खेळ! मध्यान्ह भोजनात आढळल्या अळ्या; 50 हून अधिक मुलं रुग्णालयात दाखल

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलांना अचानक त्रास होऊ लागल्याने शाळा परिसरात प्रचंड खळबळ उडाली. शाळा प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून सर्व बाधित मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Food Poisoning: चिमुरड्यांच्या जिवाशी खेळ! मध्यान्ह भोजनात आढळल्या अळ्या; 50 हून अधिक मुलं रुग्णालयात दाखल

Food Poisoning: बिहारमधील खगरिया जिल्ह्यातून 'मध्यान्ह भोजन' योजनेतील अत्यंत गंभीर निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोगरी उपविभागांतर्गत येणाऱ्या 'सुखदेव सुमन सह लेवा प्राथमिक शाळे'त दुपारचे जेवण घेतल्यानंतर 50 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलांना अचानक त्रास होऊ लागल्याने शाळा परिसरात प्रचंड खळबळ उडाली. शाळा प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून सर्व बाधित मुलांना रुग्णवाहिकेद्वारे गोगरी उपविभागीय रुग्णालयात दाखल केले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जेवणाच्या ताटात दिसले किडे 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाळेत नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण वाढण्यात आले होते. मात्र, जेवत असताना काही मुलांच्या ताटातील अन्नात अळ्या (किडे) तरंगताना आढळल्या. हा प्रकार समोर येत नाही तोच, जेवण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना एकापाठोपाठ एक पोटदुखी, उलट्या आणि तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. बघता बघता डझनभर मुलांची प्रकृती खालावल्यामुळे शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शिक्षकांनी तातडीने वैद्यकीय मदतीची मागणी केली.

डॉक्टरांचे पथक तैनात; सर्व मुलांची प्रकृती स्थिर
घटनेचे वृत्त समजताच अनेक रुग्णवाहिका तातडीने शाळा परिसरात दाखल झाल्या. आजारी पडलेल्या सर्व 50 हून अधिक मुलांना तातडीने गोगरी उपविभागीय रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांचे एक विशेष पथक या मुलांवर देखरेख ठेवून आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, योग्य वेळी उपचार सुरू झाल्यामुळे सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत.

SDO कडून प्राथमिक शाळेची पाहणी; अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवणार
या घटनेचे गांभीर्य ओळखून गोगरीचे एसडीओ (उपविभागीय अधिकारी) यांनी एका वैद्यकीय पथकासह संबंधित प्राथमिक शाळेला थेट भेट दिली. शासकीय अधिकाऱ्यांनी शाळेतील मध्यान्ह भोजनाच्या स्वयंपाकघराची पाहणी केली असून, अन्नाचा दर्जा आणि स्वच्छतेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत.

हेही वाचा – Heavy Rain IMD Alert : मुसळधार पावसाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत 7 जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दोषींवर होणार कडक कारवाई; प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष
मुलांच्या आजारपणाचे नेमके कारण काय होते, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. मध्यान्ह भोजन तयार करताना स्वच्छता न राखणे किंवा खराब अन्नधान्याचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधित कंत्राटदार आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्या स्थानिक प्रशासन रुग्णालयातील परिस्थितीवर आणि मुलांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number