देशभरातील वाहनचालकांसाठी आजचा दिलासादायक अपडेट समोर आला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून, आज इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना कालचेच दर लागू राहणार आहेत. मात्र, देशातील काही शहरांमध्ये इंधनाचे दर अद्यापही मोठ्या प्रमाणात वेगवेगळे असल्याचे चित्र आहे.
देशभरात सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल कुठे मिळते, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. सध्याच्या दरांनुसार अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर हे शहर सर्वात स्वस्त इंधनासाठी ओळखले जात आहे. येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 88.66 रुपये असून डिझेलसाठी 84.56 रुपये मोजावे लागत आहेत. देशातील इतर बहुतांश शहरांच्या तुलनेत हे दर लक्षणीयरीत्या कमी आहेत.
दररोज सकाळी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती, डॉलर-रुपया विनिमय दर आणि इतर आर्थिक घटकांचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होत असतो. मात्र, आज सरकारी कंपन्यांनी दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, खाजगी क्षेत्रातील काही इंधन कंपन्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला किरकोळ दरकपात केली होती. तरीही सरकारी कंपन्यांच्या दरांमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असला, तरी भविष्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर पुढील दरवाढ किंवा दरकपात अवलंबून असणार आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलच्या दरांवर नजर टाकल्यास मुंबईमध्ये प्रतिलिटर 111.21 रुपये, नवी दिल्लीत 102.12 रुपये, कोलकात्यात 113.51 रुपये, चेन्नईत 107.77 रुपये, बेंगळुरूमध्ये 111.68 रुपये, हैदराबादमध्ये 115.69 रुपये, पटनामध्ये 113.69 रुपये, जयपूरमध्ये 113.19 रुपये, लखनौमध्ये 101.86 रुपये, नोएडामध्ये 101.96 रुपये आणि गुरुग्राममध्ये 102.97 रुपये असा दर कायम आहे.
डिझेलच्या किमतीही आज स्थिर राहिल्या आहेत. मुंबईमध्ये डिझेल 97.83 रुपये, नवी दिल्लीत 95.20 रुपये, कोलकात्यात 99.82 रुपये, चेन्नईत 99.55 रुपये, बेंगळुरूमध्ये 99.56 रुपये, हैदराबादमध्ये 103.82 रुपये, पटनामध्ये 99.67 रुपये, जयपूरमध्ये 98.25 रुपये, लखनौमध्ये 95.36 रुपये, नोएडामध्ये 95.44 रुपये आणि गुरुग्राममध्ये 95.64 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होणाऱ्या या किमती वाहनचालकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी तपासून घेणे महत्त्वाचे ठरते. कारण राज्यनिहाय कर आणि स्थानिक शुल्कांमुळे प्रत्येक शहरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये फरक दिसून येतो.