रावलाकोटमध्ये निवडणुकांविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या जीवघेण्या कारवाईच्या वृत्तामुळे मंगळवारी पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये (PoJK) तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यावरून ऑनलाइन स्तरावर तीव्र संताप व्यक्त केला गेला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या घटनेत सुमारे 30 जण ठार झाली असून अनेकजण जखमी झाले आहेत. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ‘Massacre in PoJK’ (पाकव्याप्त काश्मीरमधील हत्याकांड) हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. एकीकडे राजकारणी निवडणुकांमध्ये मग्न असताना, दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमधील जनता आपल्या मूलभूत हक्कांसाठी निदर्शने करत आहे. तसेच, या भागातील घडामोडींबाबत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी मौन बाळगल्याचा आरोपही प्रत्यक्षदर्शी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.
एका रहिवाशाने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना आवाहन करताना म्हटले, “सर्वत्र मृतदेह पडलेले आहेत. डझनभर लोक मारले गेले आहेत आणि अनेकजण जखमी झाले आहेत. मी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना विनंती करतो की त्यांनी याची दखल घ्यावी. काश्मिरींचे रक्त सांडत आहे.” या हिंसाचाराचा संबंध रावालाकोट येथे ‘अवामी हुकूक लाँग मार्च’वर करण्यात आलेल्या कारवाईशी जोडला जात आहे. प्रत्यक्षदर्शी आणि आंदोलनाच्या नेत्यांनी असा आरोप केला आहे की, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी निदर्शकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये अनेक जण ठार झाले आणि जवळपास दोन डझन लोक जखमी झाले. ही घटना रावालाकोटमधील ‘ड्रेक ईदगाह’ (Dreik Eidgah) भागात घडली. तेथील मोठ्या संख्येने असलेल्या रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे आणि निषेध करण्यासाठी एकत्र जमल्याचे वृत्त आहे.
जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JKJAAC) आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी लष्करी जवान, पंजाब रेंजर्स आणि पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी थेट गोळीबार (live ammunition), लांब पल्ल्याचे अश्रूधुराचे गोळे आणि मोक्याच्या ठिकाणी तैनात केलेल्या स्नायपर्सचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानी लष्करी दलांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात अनेक जण हत किंवा जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 19 मृतांची ओळख पटली असून, आणखी मृत्यू झाल्याच्या वृत्तांची पडताळणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
? BREAKING: According to reports, Pakistani military forces opened fire on protesters in Rawalakot, resulting in numerous casualties. Local sources say that, so far, the bodies of 19 victims have been identified, while efforts are ongoing to verify information about… pic.twitter.com/4563IQXkRh — Falcon Defence (@FalconDefence) July 28, 2026
स्थानिक रहिवाशांनी आपण शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असल्याचा दावा केला. “आम्ही शांततापूर्णरीत्या आंदोलन करत होतो. आम्ही केवळ पुढे जाण्यासाठी मार्ग मागत होतो. आमच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि पाकिस्तानी दलांनी आमची रुग्णालये सील केली,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. निदर्शक मुझफ्फराबादच्या दिशेने कूच करण्याची तयारी करत असतानाच अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याचा आरोपही रहिवाशांनी केला.