रशिया-युक्रेनमध्ये गेल्या १३ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात अनेक भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे युद्धभूमीत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकार ऑपरेशन गंगा अंतर्गत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरुप आणत आहे. दरम्यान, पोलंडमध्ये केंद्र सरकारची ऑपरेशन गंगा मोहिम फत्ते झाली आहे.
अडकलेल्या भारतीयांसाठी सुरू केलेले ऑपरेशन गंगा मोहिम आता पोलंडमध्ये संपले आहे. सोमवारी, २०१ भारतीयांसह भारतीय हवाई दलाचे सी-१७ विमान राजधानी दिल्लीजवळील हिंडन हवाई तळावर परतले. भारताचा जखमी विद्यार्थी हरजोत सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री जनरल व्ही. के. सिंह हे देखील त्याच विमानातून मायदेशी परतले आहेत. मायदेशी येताच जखमी हरजोत सिंहला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थी हरजोत सिंहला गोळी लागली आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय दूतावासाने जखमी विद्यार्थी हरजोतला पोलंडला पोहचवले होते. त्यानंतर आता हा जखमी विद्यार्थी ऑपरेशन गंगा मोहिमेतंर्गत मायदेशी सुखरुप आणण्यात आले आहे. त्यानुसार पोलंडमधील ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम फत्ते झाली आहे.
बुडापेस्टमध्ये अडकलेल्या ६ हजार ७११ भारतीय विद्यार्थ्यांची शेवटची तुकडी ऑपरेशन गंगा मोहिमे अंतर्गत मंगळवारी हंगेरीहून परतली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटद्वारे आनंद व्यक्त केला आहे. युद्धभूमीत अडकलेले अनेक विद्यार्थी मायदेशी परतले आहेत.