शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सोमवारी दुर्गराज रायगड दुमदुमला आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.
मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता आली नव्हती. यंदा मात्र कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे यंदा पुन्हा रायगड दुमदुमला असून रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो शिवभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडवर येतात. त्यानुसार आज राज्यभरातून शिवप्रेमी रायगडावर आले आहेत. रायगडावर शिवभक्तांची लगबग झाली असून थाटामाटात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे.
स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा ३४८ वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याकरीता मोठा पोलिस बंदबस्त तैनात करण्यात आला असुन शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी हजारोंच्या संख्येत शिवभक्त किल्ले रायगडावर येणार आहेत.

नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आरती करण्यात आली. यावेळेला ढोलताशा पथकाचे वादन आणि शिवकालीन क्रिडा प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.