नवी दिल्ली: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 70 डॉलर प्रति बॅरलवरून वाढून तब्बल 122 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये इंधन दरांमध्ये सुमारे 30 ते 50 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर उत्तर अमेरिकेत 30 टक्के, युरोपमध्ये 20 टक्के आणि आफ्रिकन देशांमध्ये तब्बल 50 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या पार्श्वभूमीवर भारतासमोरही मोठे आव्हान उभे राहिले होते.
हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, सरकारसमोर दोन पर्याय होते, इतर देशांप्रमाणे इंधन दरात मोठी वाढ करणे किंवा आर्थिक ताण सहन करून नागरिकांना दिलासा देणे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दुसरा पर्याय स्वीकारत नागरिकांच्या हितासाठी आर्थिक भार उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया-युक्रेन संघर्षानंतरही गेल्या काही वर्षांत सरकारने हीच भूमिका कायम ठेवली आहे.
यासोबतच, तेल कंपन्यांना होणारा मोठा तोटा कमी करण्यासाठी सरकारने आपल्या महसुलात मोठी कपात केली आहे. पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे 24 रुपये आणि डिझेलवर सुमारे 30 रुपये इतका तोटा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आंतरराष्ट्रीय किमतींतील वाढ लक्षात घेऊन इंधन निर्यातीवर करही लावण्यात आला असून, परदेशात निर्यात करणाऱ्या रिफायनरींना हा कर भरावा लागणार आहे.
The global situation remains in flux, and we are closely monitoring developments across energy, supply chains, and essential commodities on a real-time basis. Under the leadership of Hon’ble PM @narendramodi Ji, all necessary steps are being taken to ensure uninterrupted… — Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 27, 2026
सध्याची जागतिक परिस्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे सांगत पुरी यांनी स्पष्ट केले की, ऊर्जा, पुरवठा साखळी आणि अत्यावश्यक वस्तूंच्या स्थितीवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे. देशात इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड सुरू राहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
लॉकडाऊनबाबत पसरत असलेल्या अफवांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सध्या देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अशा संवेदनशील काळात अफवा पसरवणे टाळावे आणि नागरिकांनी शांत, जबाबदार आणि एकजुटीने परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.