नवी दिल्ली: देशभरात विविध ठिकाणी बुधवारी महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीच्या दिवशी (Mahashivratri 2025) दिल्लीतील साउथ एशियन विद्यापीठाच्या मेसमध्ये मांसाहारी जेवण दिल्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी एकमेकांवर विद्यापीठात हाणामारी भडकवल्याचा आरोप केला. दरम्यान, या प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. तर, या प्रकरणाबाबत एवीव्हीपीने #MaoistsAgainstMahashivratri हा हॅशटॅग चालवला आहे.
फिश करी हिसकावून घेण्याचा प्रयत्न
विद्यापीठात दोन मेस आहेत. त्यापैकी एका ठिकाणी 26 फेब्रुवारी रोजी फिश करी दिली जात होती. भाजपच्या विद्यार्थी संघटनेच्या अभाविपशी संबंधित काही विद्यार्थ्यांनी मेसमध्ये घुसून फिश करी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मेस कमिटीशी संबंधित एका विद्यार्थिनीने याचा प्रतिक्रार केला, तेव्हा त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य या घटनेसाठी जबाबदार आहेत. दुसरीकडे, एबीव्हीपीचे म्हणणे आहे की, काही डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी इतरांचा उपवास मोडण्याचा प्रयत्न करत होते. महाशिवरात्रीसारख्या खास दिवशी मांसाहारी जेवण देण्याला अभाविपने ‘वैचारिक दहशतवाद’ म्हटले आहे. महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी एबीव्हीपीशी संबंधित विद्यार्थ्यांनी महाशिवरात्रीला मेसमध्ये फक्त शाकाहारी जेवणच द्यावे अशी विनंती केली होती, असे सांगण्यात आले आहे. तरीही मांसाहारी जेवण देण्यात आल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा – Jharkhand Crime :18 अल्पवयीन मुलांकडून 5 अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार; ग्रामस्थ संतप्त
विद्यार्थ्यांमध्ये राडा
‘साउथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बुधवारचा आहे आणि मेसमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहारी जेवण दिल्याच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली. पीडित विद्यार्थिनीने पीसीआर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. सध्या, पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि तिच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीचा तपास सुरू आहे,’ असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
Shocking! On Mahashivratri, SFI goons at SAU forcibly tried to break students’ fast by forcing non-veg on them, abusing, and assaulting them! Religious freedom is a constitutional right! Why is it under attack on campus? Will the so-called secular brigade stay silent now? ABVP… pic.twitter.com/qZYDFx3sMi — ABVP (@ABVPVoice) February 26, 2025
पोलिसांनी दिली माहिती
याबाबत अधिक माहिती देताना, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दुपारी पावणेचारच्या सुमारास मैदानगढी पोलीस ठाण्याला एसएयूमध्ये झालेल्या भांडणाबाबत पीसीआर कॉल आला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना मेसमध्ये हाणामारी होत असल्याचे आढळले.’
पोलिसांनी सांगितले की, या घटनेबाबत अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही. विद्यापीठ अंतर्गत चौकशी करत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार वाद आणि हाणामारी होत असल्याचे दिसून येत आहे.