नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकताच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या आयएसआय (ISI), लष्कर-ए-तोयबा (TRF) आणि पाकिस्तानी लष्कर यांचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले आहे. हल्ला नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणण्यात आला होता आणि त्यामागे स्पष्टपणे पाकिस्तानचा हात आहे, असे प्राथमिक निष्कर्ष एनआयएने काढले आहेत.
NIA च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी पहलगाममधील बैसरन व्हॅलीची रेकी (गुप्त पाहणी) केली होती. या रेकीचा उद्देश होता हल्ल्याच्या दृष्टीने भौगोलिक आणि सुरक्षेच्या बाबींचा अभ्यास करणे.
NIA अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI च्या इशाऱ्यानंतरच पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात या हल्ल्याचा कट रचण्यात आला.
हल्ला घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रं दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात आधीच लपवून ठेवली होती. हे ठिकाण हल्ला झालेल्या बैसरन भागापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे.
या हल्ल्यात स्थानिक ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) चा देखील सहभाग होता. त्यांनी दहशतवाद्यांना मदत केली, त्यांची यादी NIA कडून तयार करण्यात आली असून, लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (POK) हँडलर्सच्या थेट संपर्कात होते. या हँडलर्समार्फतच त्यांना हल्ल्याचे आदेश आणि सूचना दिल्या जात होत्या.
एनआयए अहवालात दोन मास्टरमाईंड्सचा उल्लेख आहे:
-हाशमी मूसा
-अली भाई उर्फ तल्हा भाई
हे दोघेही पाकिस्तानचे नागरिक असून, ते गेल्या अनेक दिवसांपासून या कारवायेत सक्रिय होते. त्यांना पाकिस्तानातूनच हल्ल्याचे आदेश दिले जात होते.
या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा (TRF) या दहशतवादी संघटनेचा थेट हात असल्याचेही अहवालात नमूद आहे. ही संघटना आयएसआयच्या नियंत्रणाखाली काम करते.
हेही वाचा: नवनीत राणांचा जिल्हा रुग्णालयावर हल्लाबोल
NIA च्या या अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, भारतातील अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानमधून नियोजनबद्ध दहशतवादी कारवाया राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून या अहवालाच्या आधारे पुढील दोन दिवसांत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.