एकीकडे भारताचं चांद्रयान 2 चं विक्रम लँडर चंद्रावर उतरू न शकल्यामुळे पाकिस्तानात जोरदार ट्रोलिंग होतंय, मात्र त्याचवेळी न्यूयॉर्क टाईम्ससारख्या जगातल्या अग्रगण्य वर्तमानपत्राने मात्र ISRO चं कौतुक केलंय. भारताच्या अवकाश मोहिमेचं आणि इंजिनिअरिंगच्या कौशल्याचं New York Times ने कौतूक केलंय.
चांद्रयान-2 चं लँडर जरी चंद्रावर उतरू शकलं नसलं, तरी ऑर्बिटर अवकाशात कार्यरत राहणार आहे, त्यामुळे हे पूर्णपणे अपयश नाही.
मात्र चंद्रावर पोहोचणाऱ्या देशांच्या यादीत पोहोचायला भारताला आणखी काही काळ लागणार आहे, असं NYTने म्हटलंय.
तसंच वॉशिंग्टन टाईम्स या वर्तमान पत्रानेही या मोहिमेची दखल घेतली आहे.
आत्तापर्यंत 38 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचे प्रयत्न झाले तरी त्यात प्रत्येकवेळी यश मिळालेलं नाही.
अमेरिका, रशिया,चीननंतर भारतच चंद्रावर लँडिंग करणारा देश ठरेल, अशी अपेक्षा होती, असं वॉशिंग्टन टाईम्सने म्हटलंय.
भारताच्या चांद्रयान-२ चं ‘ विक्रम लॅंडर ‘ चंद्राच्या दक्षिण ध्रुवप्रदेशात अलगद उतरणार होते. त्यातून पाठविण्यात आलेले ‘प्रज्ञान रोव्हर ‘चांद्रभूमीवर भ्रमण करणार होते. GSLVMK या रॉकेटने आपलं काम चोख बजावलं. चांद्रयान-२ ने पृथ्वी भोवती यशस्वी भ्रमण केलं. आर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वी भ्रमण करू लागलं. विक्रम लॅंडर प्रज्ञान रोवरला बरोबर घेऊन यशस्वीपणे चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या आर्बिटरपासून विलग झालं. विक्रम लॅंडर प्रज्ञान रोवरला बरोबर घेऊन यशस्वीपणे चांद्रभूमीकडे निघालं आणि विक्रम लॅंडर चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा संपर्क थांबला. विक्रम लॅंडरचा संपर्क थांबला. मात्र चंद्रावर उतरणं जरी शक्य झालं नसलं, तरी चांद्रयान-2 मोहीमेत 99 टक्के यश मिळालं आहे.