Netflix: OTT प्रेक्षकांसाठी हा वीकेंड मनोरंजनाने भरलेला ठरणार आहे. Netflix वर सध्या वेगवेगळ्या जॉनरमधील अनेक चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अॅक्शन, कॉमेडी, स्पोर्ट्स ड्रामा आणि सुपरहिरो अशा विविध प्रकारच्या सिनेमांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे या यादीतील काही चित्रपट थिएटरनंतर आता OTT वरही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत.
‘गट्टा कुस्ती 2’ची जोरदार सुरुवात
Netflix वरील सध्याच्या ट्रेंडिंग यादीत ‘गट्टा कुस्ती 2’ने आघाडी घेतली आहे. विष्णू विशाल आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा स्पोर्ट्स ड्रामा अॅक्शन आणि कॉमेडीचा मिलाफ आहे. 2022 मध्ये आलेल्या ‘गट्टा कुस्ती’चा हा अधिकृत सिक्वेल असून, स्ट्रीमिंग सुरू झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘कॉन सिटी’नेही वेधलं लक्ष
अर्जुन दास आणि अन्ना बेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कॉन सिटी’ हा चित्रपट Netflix च्या ग्लोबल ट्रेंडिंग यादीत वरच्या स्थानावर आहे. हरीश दुरैराज यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा एका वेगळ्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कर्नाटकातील मुल्कीमध्ये हॉटेल व्यवसायाच्या आडून सुरू असलेल्या ठगांच्या टोळीभोवती कथा फिरते.
राम चरणचा ‘पेड्डी’ ट्रेंडिंग
राम चरण अभिनीत ‘पेड्डी’नेही OTT वर आपली छाप पाडली आहे. स्पोर्ट्स ड्रामा प्रकारातील या चित्रपटात जाह्नवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शिवा राजकुमार आणि दिव्येंदु यांच्याही भूमिका सिनेमात पाहायला मिळतात. Netflix च्या ट्रेंडिंग यादीत या चित्रपटाने तिसरे स्थान मिळवले आहे.
‘पति पत्नी और वो 2’चीही चर्चा
आयुष्मान खुराना यांच्या ‘पति पत्नी और वो 2’ या कॉमेडी चित्रपटालाही OTT प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. नातेसंबंध आणि गोंधळावर आधारित या विनोदी कथेला Netflix वर चांगला प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट ट्रेंडिंग यादीत सहाव्या स्थानावर आहे.
पुन्हा चर्चेत ‘स्पायडर-मॅन: होमकमिंग’
Marvel चाहत्यांसाठीही Netflix वर खास पर्याय आहे. टॉम हॉलंडचा ‘स्पायडर-मॅन: होमकमिंग’ हा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला लोकप्रिय सुपरहिरो चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्याच्या Netflix ट्रेंडिंग यादीत त्याने आठवे स्थान पटकावले आहे.
त्यामुळे या वीकेंडला नवीन रिलीजसोबत जुना आवडता सुपरहिरो चित्रपट पाहण्याचा पर्यायही प्रेक्षकांसमोर आहे. Netflix वरील ही ट्रेंडिंग यादी पाहता OTT मनोरंजनाचा पर्याय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसते.