हवा प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही मागे टाकत मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे.
स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्सनुसार, २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई हे जगातील दुसरे सर्वात प्रदूषित शहर होते. २९ जानेवारी २०२३ रोजी सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दहाव्या स्थानावर होती. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर पोहोचली. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदूषणाबाबत मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीलाही मागे टाकले. आता, दिल्ली हवेच्या गुणवत्तेसाठी जगातील तिसरे सर्वात प्रदूषित शहर बनले आहे.
आयक्यू एअर (IQAir), युएनईपी (UNEP) आणि ग्रीनपीस (Greenpeace) यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील (CPCB) माहितीनुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता मोजली. तसेच, त्याचे यूएस हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार ‘निरोगी’, अस्वास्थ्यकर’ आणि ‘धोकादायक’ असे वर्गीकरण केले. यानुसार, गेल्या तीन वर्षाच्या हिवाळ्याच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मुंबईतील हवा ‘खराब’ आणि ‘खूप खराब’ होती.
तज्ज्ञांच्या मते, कार, रस्ते आणि इमारतींच्या प्रकल्पांतून सतत निर्माण होणारी धूळ आणि धूर हे प्रदूषण वाढीची प्रमुख कारणे आहेत. नीरी ( NEERI ) आणि आयआयटी- बी ( IIT-B) च्या २०२० सालच्या संशोधनानुसार, मुंबईच्या हवेतील ७१% पेक्षा जास्त धूलिकण रस्ते किंवा बांधकामांच्या धुळीतून निर्माण होते.तसेच, उर्वरित प्रदूषण कारखाने, पॉवर प्लांट, विमानतळ आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांद्वारे निर्माण होते.