मुंबई: मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलचा धगधगत्या धुराने वेढलेला घुमट 26/11 च्या त्या काळ्याकुट्ट रात्रीचे अविस्मरणीय प्रतीक ठरले. आजही 17 वर्षांनंतर हा हल्ला केवळ दहशतीची आठवण नाही, तर भारतीय नागरिकांच्या अदम्य लढाऊ वृत्तीचा पुरावा आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि अरबी समुद्राकडे भव्य नजर ठेवणारे हे आयकॉनिक हॉटेल 26 ते 28 नोव्हेंबर 2008 दरम्यान अमानुष हिंसेचे केंद्र बनले. त्या रात्री दहशतवाद्यांनी ताज पॅलेस आणि ट्रायडंटसह अनेक ठिकाणांवर अंधाधुंद गोळीबार केला. ट्रायडंटमधील लॉबी, बार आणि सेवा विभागात परदेशातील व देशातील नागरिक व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला.
ताजमधील ‘टिफिन’ रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असलेल्या नागरिकांवरही जोरदार हल्ला करण्यात आला आणि इथेच सर्वाधिक बळी गेले. त्यानंतर वरच्या मजल्यावरील ‘कांधार’ रेस्टॉरंटमध्ये ग्रेनेड फेकले गेले, आगी लागल्या आणि अनेक विदेशी नागरिक आत अडकले. परिस्थिती गंभीर होत गेली. या भयावह परिस्थितीतही ताजच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धैर्य उल्लेखनीय ठरले. नियमित अग्निशमन प्रशिक्षणामुळे आणि बाहेर पडण्याचे मार्ग माहित असल्यामुळे त्यांनी, तत्कालीन हेड शेफ हेमंत ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली, 200 हून अधिक नागरिकांचे प्राण वाचवले. त्याचवेळी कमांडो आणि सुरक्षा दलांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून बहुसंख्य अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
दहशतवाद्यांनी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) येथे गोळीबार केला होता. काही क्षणांत 58 जण ठार आणि 104 जखमी झाले. गर्दीत मिसळून हल्लेखोर पळून गेले आणि काही मिनिटांतच ताज, ट्रायडंट, कामा अँड अल्ब्लेस हॉस्पिटल, कोलाब्यातील लिओपोल्ड कॅफे तसेच वाडीबंदर आणि विलेपार्ले येथे टाक्सींमध्ये ठेवलेल्या बॉम्बस्फोटांनी शहर हादरले. याच हल्ल्यादरम्यान एक जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला पकडण्यात पोलिसांना यश आले. आणि त्याला आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर कायदेशीर प्रक्रियेनंतर फासावर लटकवण्यात आले.
या 60 तासांच्या भीषण हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू तर 300 हून अधिक नागरिक जखमी झाले. या रक्तरंजित रात्री मुंबईच्या रस्त्यांवर शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामते आणि विजय साळसकर यांनी कर्तव्य बजावताना देशासाठी प्राण अर्पण केले. आज, या हल्ल्याच्या स्मृती पुन्हा जाग्या होत असताना, मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस दलातील कर्मचारी गेटवे ऑफ इंडिया जवळ आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पाकिस्तानमधून सहाय्य मिळालेल्या या हल्ल्याने देशाला जखमा दिल्या, पण नागरिकांच्या जिद्दीने दहशतीला ठाम प्रत्युत्तर दिले. आणि आजही तीच प्रतिज्ञा मनात येत राहते ‘नेव्हर फर्गेट; नेव्हर फोर्गिव्ह’.