Mouni Roy divorce: टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. पती सुरज नांबियार याच्यासोबत तिच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरत होत्या. अखेर या सर्व चर्चांवर स्वतः मौनीने प्रतिक्रिया देत त्यांच्या वेगळं होण्याच्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मौनी आणि सूरज यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा सुरू होती. तसेच दोघांनी एकत्रचे अनेक फोटो हटवल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले होते. मात्र याबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता त्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.
निवेदनात दोघांनी म्हटलं आहे की, 'बराच विचार आणि चर्चेनंतर आम्ही आमच्या आयुष्यात वेगवेगळ्या वाटा निवडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना आम्ही एकमेकांबद्दलचा आदर कायम ठेवला आहे.' आयुष्यातील बदलते प्राधान्यक्रम आणि वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांबद्दल मौनीने नाराजी व्यक्त केली. 'आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा,' अशी भावनिक विनंती तिने चाहत्यांना आणि माध्यमांना केली.
विशेष म्हणजे, वेगळं होण्याचा निर्णय घेतला असला तरी दोघांमध्ये कटुता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यातही मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. सध्या दोघेही मानसिकदृष्ट्या या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असून शांततेत पुढील प्रक्रिया पूर्ण करू इच्छित असल्याचं समजत आहे.
मौनी आणि सूरज यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली होती. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 27 जानेवारी 2022 रोजी गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. बंगाली आणि मल्याळी अशा दोन्ही परंपरांमध्ये पार पडलेल्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती आणि चाहत्यांनीही या जोडीवर भरभरून प्रेम व्यक्त केलं होतं. मात्र अवघ्या काही वर्षांतच या नात्याचा शेवट होणार असल्याच्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.