Mohan Bhagwat: ‘Gen Z चे आंदोलन चुकीचे नाही, पण त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे’; मोहन भागवत यांचे महत्त्वाचे मत

आंदोलन म्हणजे केवळ संघर्ष नसून तो संवादाचा एक प्रभावी मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Mohan Bhagwat: ‘Gen Z चे आंदोलन चुकीचे नाही, पण त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे’; मोहन भागवत यांचे महत्त्वाचे मत

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी Gen Z अर्थात नव्या पिढीच्या आंदोलनांबाबत आणि त्यांच्या विचारसरणीबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. आजची तरुण पिढी प्रश्न विचारते, बदलाची मागणी करते आणि हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन म्हणजे केवळ संघर्ष नसून तो संवादाचा एक प्रभावी मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलन म्हणजे संवादाचे माध्यम

मोहन भागवत म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात अधिक सुविधा आणि सुधारणा व्हाव्यात, या अपेक्षेतून अनेकदा Gen Z रस्त्यावर उतरते. त्यामुळे प्रत्येक आंदोलनाकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी त्यामागील कारण समजून घेणे आवश्यक आहे. आंदोलन हा संवादाचाच एक भाग आहे आणि त्यातून समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.

आमच्या काळात ऐकायचो, आजची पिढी प्रश्न विचारते

ते पुढे म्हणाले की, त्यांच्या पिढीत मोठी माणसे जे सांगायची ते विनातक्रार स्वीकारण्याची पद्धत होती. मात्र आजची Gen Z कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीमागचे कारण जाणून घ्यायचे असते. ही बदललेली मानसिकता चुकीची नसून त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. प्रेम, विश्वास आणि संवाद असेल तर प्रत्येक प्रश्नाचे समाधान मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

लोकशाहीत मतभेद स्वाभाविक

लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. विचारांची देवाणघेवाण, मतभेद आणि त्यावर चर्चा ही लोकशाहीची ताकद आहे. त्यामुळे मतभिन्नता असणे चुकीचे नाही. उलट संवादातूनच योग्य मार्ग आणि तोडगा निघतो, असे भागवत यांनी सांगितले.

आंदोलनाला विरोध नाही, पण दिशा महत्त्वाची

Gen Z ने आंदोलन करू नये, असे मी म्हणणार नाही. मात्र आंदोलन योग्य पद्धतीने, जबाबदारीने आणि समाजहित लक्षात घेऊन झाले पाहिजे. व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी आंदोलन करणे योग्य आहे. मात्र त्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळणेही तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘Gen Z दहशतवादी नाहीत, ते आपल्या समाजाचाच भाग आहेत’

तरुण विद्यार्थ्यांबद्दल बोलताना भागवत म्हणाले की, ते शिक्षण घेत आहेत आणि देशाचे भविष्य घडवत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचे कोणतेही कारण नाही. आजची Gen Z आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिकपणे आपले मत मांडणारी आहे. त्यांच्यात सत्य बोलण्याचे धाडस अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराबाबत सावध प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही घाईघाईने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या प्रकरणाची संपूर्ण माहिती नसताना कोणावरही दोषारोप करणे योग्य ठरणार नाही. नेमके काय घडले, चूक कुठे झाली, याची वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच मत व्यक्त करणे योग्य राहील, असे त्यांनी सांगितले.

‘Gen Z वर माझा पूर्ण विश्वास आहे’

आपल्या भाषणाचा शेवट करताना मोहन भागवत यांनी नव्या पिढीवर विश्वास व्यक्त केला. “मी Gen Z वर डोळे बंद करून विश्वास ठेवतो. ही पिढी प्रामाणिक आहे, प्रश्न विचारते आणि देशात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता Gen Z मध्ये आहे,” असे ते म्हणाले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number