सोशल मीडिया क्षेत्रात मोठी कायदेशीर कारवाई समोर आली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा कंपनीला अमेरिकेतील न्यायालयाने मोठा दंड ठोठावत मुलांच्या सुरक्षिततेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही फीचर्समुळे अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेची प्रवृत्ती वाढत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. याचबरोबर अशा फीचर्समध्ये तातडीने बदल करण्याचे आदेशही मेटाला देण्यात आले आहेत. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील काही डिझाइन फीचर्समुळे लहान मुले आणि किशोरवयीन वापरकर्त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या प्रकरणात न्यायालयाने मेटावर 567 दशलक्ष डॉलर्सचा आर्थिक दंड लावला आहे. हा निर्णय सोशल मीडिया कंपन्यांच्या जबाबदारीबाबत महत्त्वाचा मानला जात आहे.
हेही वाचा – School Firing: घरी आजी-आजोबांना गोळ्या घातल्या, नंतर शाळेतही केला बेछूट गोळीबार; 8 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
या खटल्याची सुरुवात न्यू मेक्सिकोचे ॲटर्नी जनरल राऊल टॉरेझ यांनी केली होती. मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत ज्युरीने मेटाला दोषी ठरवत कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मच्या सुरक्षिततेबाबत पालक आणि वापरकर्त्यांची दिशाभूल केल्याचे नमूद केले होते. तसेच मुलांच्या मानसिक आरोग्याला धोका निर्माण करणारी फीचर्स असल्याची माहिती असूनही कंपनीने त्यामध्ये आवश्यक सुधारणा केल्या नाहीत. बाल लैंगिक शोषणाशी संबंधित काही गंभीर बाबींकडेही कंपनीने पुरेसे लक्ष दिले नसल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले होते. या खटल्याच्या पहिल्या टप्प्यात मेटावर 375 दशलक्ष डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला होता.