राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा जोर धरु लागल्या असताना याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले. सकाळपासून सुनिल तटकरे ,छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख देवगिरी बंगल्यावर आहेत.
अखेर अजित पवारांनीच आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं स्पष्ट करत या चर्चांवर पडदा टाकला. परंतू, मागील काही तासांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांशी वैयक्तिक फोन करुन संवाद साधला असल्याची माहिती समोर येत आहे. पाहिलं तर ज्या प्रकारे गाठीभेटी होत आहेत, त्यानंतर पुन्हा एकदा या चर्चला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारयांच्या बंडाच्या चर्चांनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळेच शरद पवार सतर्क झाले असून सावधगिरीचे पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे. पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांशी संवाद साधत आहे. यावेळी पवारांकडून पक्षाची पुढील काळातील वाटचाल, ध्येय धोरणं, निवडणुकांसाठी रणनीती यांसारख्या अनेक मुद्द्यांवर आमदारांशी चर्चा केली जात आहे.
बुधवारी देवगिरीवरती या नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. त्यानंतर अजित पवार हे माध्यमांची नजर चुकवून एका वेगळ्या गाडीतून विधानभवनाच्या दिशेने निघाले, अशा पद्धतीची माहिती माहीत आहे. यामुळे पुन्हा अजित पवार भाजपमध्ये जातील, अशी चर्चा रंगली आहे.