मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी : माजी मंत्री पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच नवी दिल्ली येथे एका मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखदही व्यक्त केली होती. ‘मी भाजपची असले, तरी भाजप माझा पक्ष नाही’ असे म्हटले होते. यावरुन पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पंकजा यांच्या विधानानंतर एकनाथ खडसे यांनी पंकजा यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज एकनाथ खडसे पंकजा यांची भेट घेणार आहे. मात्र भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. पंकजा भाजपमध्ये नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची शनिवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गोपीनाथ गडावर मोठी गर्दी होते. या कार्यक्रमाला एकनाथ खडसे हे देखील जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खडसे आणि मुंडे यांच्या भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत. पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता या आधी देखील वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीमुळे या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
यासंदर्भात मीडियाशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभा आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्थता म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजप पक्ष वर्षांवर्ष ज्यांनी वाढवला. बहुजन समाजापर्यंत पोहोचला. अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होतोय, पंकजा मुंडे यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी आहे. आता जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होत आहे, असा आरोप खडसे यांनी यावेळी केला.