आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. यासाठी राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सहावा उमेदवार मैदानात उतरवल्याने चुरस वाढली आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर दिल्लीचा रस्ता सुकर होणार असल्याने समीकरणं अवघड झाली आहेत.
दरम्यान, मतदानाची परवानगी देण्याची मागणी तुरुंगात असणाऱ्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयाने याला नकार दिल्यानंतर देशमुख आणि मलिकांनी वरील न्यायालयात धाव घेतली. मात्र विशेष न्यायालयानेही त्यांना दणका दिला. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मतं कमी होणार हे स्पष्ट होतं. यानंतर दोन्ही मंत्र्यांच्या वकिलांनी पुन्हा याचिका दाखल केली. ईडीकडून अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला.
अनिल देसाई यांनी मलिक यांची बाजू मांडली. यासाठी त्यांनी तात्पुरत्या जामिनाची मागणी केली आहे. मात्र अटक असताना जामीन कोणत्या आधारावर द्यायचा, असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर प्रत्युत्तर देताना पोलीस बंदोबस्तात मतदान करू देण्याची मागणी करण्यात आली. मात्र आता मलिकांना सुधारित याचिकेबाबतही फटका बसला आहे.
सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मलिक यानी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई सत्र न्यायालयाने मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी परवानगी मिळण्याची याचिका फेटाळली होती. अमित देसाई हे मलिक यांना तात्पुरता जामीन किंवा पोलीस बंदोबस्तात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने नकार दिला. तसेच सुधारित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र न्यायालयाने सुधारित याचिका देखील फेटाळली आहे.