नवी दिल्ली: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाचा परिणाम भारतातही जाणवू लागला आहे. देशातील अनेक भागांत एलपीजी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून काही शहरांत गॅस सिलेंडरची कमतरता असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. त्यामुळे हॉटेल, हॉस्टेल तसेच लहान व्यवसायांवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशात एलपीजीचा पुरवठा सुरळीत असून दररोज लाखो सिलेंडरचा पुरवठा केली जात आहे.
दरम्यान, स्वयंपाकासाठी आपण सर्वजण गॅस सिलेंडरवर अवलंबून असतो. पण रोजच्या वापरातील या वस्तूबाबतची एक महत्त्वाची गोष्ट अनेकजण दुर्लक्षित करतात आणि ती म्हणजे सिलेंडरची एक्सपायरी डेट. आपण बाजारातून घेतलेल्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासतो, मात्र गॅस सिलेंडर घेताना अनेकदा ही गोष्ट लक्षात राहत नाही. एक्सपायर झालेल्या सिलेंडरचा वापर केल्यास गॅस गळती, आग लागणे किंवा स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे घरात वापरला जाणारा सिलेंडर सुरक्षित आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सिलेंडरची एक्सपायरी किंवा वैधता तपासणे खूप सोपे आहे. सिलेंडरच्या वरच्या भागावर असलेल्या लोखंडी पट्टीवर यासंबंधीची माहिती लिहिलेली असते. सिलेंडरवर A, B, C किंवा D अशा अक्षरांसोबत 28, 29, 27 असे अंक लिहिलेले दिसतात. उदाहरणार्थ A28, B29, C26 किंवा D27 असे कोड दिसतात. हेच कोड सिलेंडरच्या टेस्टिंग किंवा एक्सपायरी कालावधीची माहिती देतात.
या कोडमधील इंग्रजी अक्षरे त्या वर्षातील तिमाही किंवा महिन्यांचा कालावधी दर्शवतात. त्यानुसार A म्हणजे जानेवारी ते मार्च, B म्हणजे एप्रिल ते जून, C म्हणजे जुलै ते सप्टेंबर, तर D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर असा अर्थ होतो. या अक्षरानंतर दिलेले अंक त्या वर्षाची माहिती देतात. उदाहरणार्थ सिलेंडरवर D27 असे लिहिले असेल तर तो सिलेंडर ऑक्टोबर ते डिसेंबर 2027 पर्यंत वैध मानला जातो. त्याचप्रमाणे B29 लिहिले असेल तर तो सिलेंडर एप्रिल ते जून 2029 पर्यंत वापरण्यास योग्य असतो.
गॅस सिलेंडरमध्ये दीर्घकाळ उच्च दाबाखाली गॅस साठवला जातो. त्यामुळे कालांतराने त्यातील धातू कमकुवत होण्याची शक्यता असते आणि वाल्वमध्येही बिघाड होऊ शकतो. अशा परिस्थितीत एक्सपायर झालेला सिलेंडर वापरल्यास गॅस गळती किंवा स्फोट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सिलेंडरची एक्सपायरी किंवा टेस्टिंग डेट तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुमच्या घरी आलेला सिलेंडर एक्सपायरी डेट पार केलेला असेल, तर तो वापरणे टाळावे. अशा वेळी त्वरित गॅस एजन्सी किंवा वितरकाला माहिती देऊन सिलेंडर बदलून घ्यावा. तसेच सिलेंडरची डिलिव्हरी घेताना त्याची सील, वजन आणि एक्सपायरी डेट तपासण्याची सवय लावणेही गरजेचे आहे. जर सिलेंडरची सील तुटलेली किंवा सैल दिसत असेल, तर असा सिलेंडर स्वीकारणे टाळावे. त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.