EMI संपवण्याआधी सावध! लोन प्रीपेमेंटचा क्रेडिट स्कोअरवर होतो असा परिणाम

कर्जाची आगाऊ परतफेड ही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी तिचा क्रेडिट स्कोअरवर होणारा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो.

EMI संपवण्याआधी सावध! लोन प्रीपेमेंटचा क्रेडिट स्कोअरवर होतो असा परिणाम

अनेक जण बँकेचे कर्ज घेतल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारली की कर्जाची आगाऊ परतफेड (Prepayment) करण्याचा निर्णय घेतात. मात्र, कर्ज मुदतीपूर्वी फेडल्याने क्रेडिट स्कोअरवर नेमका काय परिणाम होतो, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. प्रत्यक्षात, कर्जाची आगाऊ परतफेड ही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी तिचा क्रेडिट स्कोअरवर होणारा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो.

 कर्ज लवकर फेडल्याने स्कोअर लगेच वाढत नाही

कर्ज पूर्णपणे फेडल्याने तुमची आर्थिक जबाबदारी कमी होते आणि व्याजाचाही खर्च वाचतो. मात्र, याचा अर्थ क्रेडिट स्कोअर लगेच वाढेल, असा नाही. क्रेडिट स्कोअर ठरवताना वेळेवर ईएमआय भरण्याची सवय, क्रेडिट हिस्ट्री, एकूण कर्ज, क्रेडिट कार्डचा वापर आणि नवीन कर्जासाठी केलेले अर्ज अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यामुळे कर्जाची आगाऊ परतफेड केल्यानंतर काही वेळा स्कोअरमध्ये थोडी घटही दिसू शकते.

 प्रीपेमेंटचे फायदे काय?

कर्ज लवकर संपवल्याने मासिक ईएमआयचा ताण कमी होतो आणि उत्पन्नातील मोठा हिस्सा इतर आर्थिक गरजांसाठी वापरता येतो. यामुळे भविष्यातील आर्थिक नियोजन अधिक सुलभ होते. तसेच, ईएमआय चुकण्याचा धोका कमी होतो आणि दीर्घकालीन दृष्टीने तुमची आर्थिक विश्वासार्हता मजबूत होण्यास मदत होते.

 क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी काय करावे?

क्रेडिट स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ईएमआय आणि बिलाची वेळेवर भरपाई करणे. याशिवाय क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवणे, अनावश्यक कर्ज टाळणे आणि नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कर्ज 'Closed' झाले की 'Settled', हे तपासा

कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये खात्याची स्थिती 'Closed' अशी नोंद झाली आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. 'Closed' म्हणजे संपूर्ण कर्जाची परतफेड झाली आहे. तर 'Settled' म्हणजे बँकेने पूर्ण रक्कम न घेता खाते बंद केले आहे. 'Settled' अशी नोंद असल्यास भविष्यात नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवताना अडचणी येऊ शकतात.

 कर्ज लवकर बंद करण्याचे काही परिणाम

जर तुमच्याकडे एकच सक्रिय कर्ज असेल आणि तेही पूर्णपणे बंद झाले, तर काही काळासाठी तुमचा सक्रिय क्रेडिट इतिहास कमी होऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअरमध्ये किरकोळ घसरण होण्याची शक्यता असते. मात्र, केवळ स्कोअर टिकवून ठेवण्यासाठी विनाकारण कर्ज सुरू ठेवणे योग्य नाही. त्यामुळे कर्जाची आगाऊ परतफेड करण्यापूर्वी संबंधित बँकेचे प्रीपेमेंट शुल्क, अटी आणि क्रेडिट स्कोअरवरील संभाव्य परिणाम समजून घेऊनच निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number