मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जात असून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किसन रेड्डी आणि राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाआधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नामवंत लेखक, विचारवंत आणि मराठी कलाकार यांचे पत्र केंद्र सरकारला देण्यात येणार असल्याचे, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी, सर्व क्षेत्रांतील अनेक मान्यवर एकटवले आहेत. मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जात आहे. या शिष्टमंडळात प्रधान सचिव भूषण गगराणी आणि लेखक-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचा सहभाग आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रश्न गेली अनेक वर्षे केंद्राकडे प्रलंबित आहे. त्यासाठी आज राज्य सरकारने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जनअभियान सुरू करण्यात आले आहे.