मराठी विनोदी कार्यक्रमांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या भन्नाट विनोदशैलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता कुशल बद्रिके लवकरच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर झळकणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, अनेक चाहत्यांनी कुशल आता हास्यजत्रेचा कायमस्वरूपी भाग होणार का, अशी उत्सुकता व्यक्त केली आहे. सोनी मराठीने प्रसिद्ध केलेल्या नव्या प्रोमोमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. या धमाल वातावरणात अचानक कुशल बद्रिकेची स्टायलिश एन्ट्री होते आणि स्किटला वेगळीच रंगत येते. त्याचे प्रियदर्शिनी इंदलकर आणि दत्तू मोरे यांच्यासोबतचे विनोदी प्रसंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
प्रोमो व्हायरल होताच अनेकांनी कुशल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमध्ये नियमित दिसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र प्रत्यक्षात तसं नाही. कुशल बद्रिके हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये कायमस्वरूपी सहभागी होत नसून, तो विशेष पाहुणा म्हणून कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. त्याच्या आगामी 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तो हास्यजत्रेच्या मंचावर येणार आहे.
या विशेष भागामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांच्यासह इतर कलाकारही उपस्थित राहणार आहेत. 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटात अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि अभिजित चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोदी धाटणीचा हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाने तब्बल दशकभर मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कार्यक्रम संपल्यानंतरही त्यातील कलाकारांवरील प्रेक्षकांचे प्रेम कमी झालेले नाही. त्यामुळे कुशल बद्रिकेला पुन्हा एकदा विनोदी मंचावर पाहण्याची संधी मिळणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रोमोमधील कुशलच्या एन्ट्रीमुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या आगामी भागाबाबत उत्सुकता आणखी वाढली असून, हा भाग प्रसारित झाल्यानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याच्या खास विनोदशैलीची झलक अनुभवायला मिळणार आहे.