स्वर्गीय खाशाबा जाधव करंडक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान धुळे जिल्ह्याला मिळाला आहे. धुळे शहरात २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा होणार आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कुस्ती स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्व.पै.खाशाबा जाधव करंडक कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. फ्री स्टाईल, ग्रीको रोमन आणि मुलींचा संघ अशा तीन गटात या कुस्ती स्पर्धा होणार असून राज्यभरातील अनेक नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
पालकमंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला कुस्तीची परंपरा लाभली असून ती अजतागायत सुरु आहे. धुळ्यातील मल्लांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हावासियांना एक आनंदाची पर्वणी राहणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या तातडीने गठीत करुन कामांचे वाटप करण्याच्या सुचनांही त्यांनी दिल्या.
प्रत्येक संघात ७ खेळाडू, १ क्रीडा मार्गदर्शक व १ व्यवस्थापक असा एकूण ९ जणांचा समावेश राहील. या स्पर्धेत ३६० वरिष्ठ कुस्तीगीर, १०० पंच व पदाधिकारी तसेच ५० स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण ६५० जण सहभागी होणार आहेत. या स्पर्धा तीन पोडियममध्ये मॅटवर लावण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण ३१ लाख २० हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू व इतर यांची भोजन, निवास, प्रवास खर्च देण्यात येणार असून प्रेक्षकांसाठी गरुड मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील यांनी सांगितले. स्पर्धेचे प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीत दिली.