श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या विधानसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू झाले आहे. हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात विधानसभेच्या २६ जागांसाठी २३९ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे २५ लाख पात्र मतदार उमेदावारांचे भवितव्य ठरवतील. काश्मीर विभागातील गांदरबल, श्रीनगर, बडगाम आणि जम्मू विभागातील रियासी, राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू आहे.
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, जेकेपीसीसीचे अध्यक्ष तारिक हमीद कारा आणि भाजपाचे जम्मू काश्मीर प्रमुख रविंदर रैना हे दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ६१.१३ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात २६ जागांसाठी मतदान सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात ४० जागांसाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. मतमोजणी ८ ऑक्टोबर रोजी होईल.