इस्त्रायलचा भारताला ठाम पाठिंबा; स्वसंरक्षणाच्या अधिकाराची मान्यता

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या कारवाईला इस्त्रायलचा पाठिंबा; दहशतवाद्यांना जगात कुठेही आसरा नाही, अशी ठाम भूमिका इस्रायली राजदूतांची.

इस्त्रायलचा भारताला ठाम पाठिंबा; स्वसंरक्षणाच्या अधिकाराची मान्यता

नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या अचूक हवाई हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा मिळू लागला आहे. विशेषतः इस्त्रायलने उघडपणे भारताच्या बाजूने उभं राहत, भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं ठाम समर्थन केलं आहे. इस्त्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (आधीचे ट्विटर) वरून भारताच्या भूमिकेचं समर्थन करत ठामपणे सांगितलं, 'इस्त्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा देतो. दहशतवाद्यांनी हे समजून घ्यावं की निष्पापांवर घातपात करणाऱ्यांसाठी आता या जगात कुठेही आसरा उरणार नाही.'
 

jaimaharashtr

ही प्रतिक्रिया भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर काही तासांतच आली, ज्यात भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, आणि हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित नऊ ठिकाणांवर लक्ष्य साधून हल्ला केला होता. हे सर्व हल्ले, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने प्रतिशोध म्हणून केले होते. त्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा:श्रीनगर विमानतळावर हवाई वाहतूक ठप्प; भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरक्षा वाढवली

भारताच्या या निर्णायक कारवाईनंतर इस्त्रायलने दिलेला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही हल्ल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोक व्यक्त करत एक सहानुभूतीपूर्ण संदेश पाठवला होता. त्यांनी ट्विट करत म्हटलं, 'माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदी, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या पाशवी दहशतवादी हल्ल्यामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या हल्ल्यात अनेक निष्पापांचा बळी गेला. आमच्या प्रार्थना आणि सहवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबांसोबत आहेत. इस्त्रायल भारतासोबत आहे, दहशतवादाविरोधाच्या लढ्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत.'

jaimaharshtrnews

 

भारत आणि इस्त्रायल यांचे संरक्षण, तंत्रज्ञान व दहशतवादविरोधी लढ्यांमध्ये दृढ संबंध आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये सामरिक सहकार्य अधिक घट्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रायलचा पाठींबा म्हणजे भारताच्या आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तबच आहे.

 

भारताने घेतलेली ही आक्रमक आणि धाडसी भूमिका जागतिक स्तरावर दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश देणारी आहे, की भारत आता सहन करणार नाही, आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही किंमत मोजायला मागेपुढे पाहणार नाही. इस्त्रायलसारख्या देशांचा ठाम पाठिंबा म्हणजे भारताच्या धोरणात्मक निर्णयांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याचं प्रतीक आहे.

दहशतवाद्यांवर कठोर कारवाई आणि जागतिक पाठींब्याची खात्री ही भारताची नवी ओळख बनत आहे, आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number