Iran Missile Attack On US Warship: पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणने भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकन युद्धनौका 'USS अब्राहम लिंकन' ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य केले आहे. इराणने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांचे क्षेपणास्त्र या युद्धनौकेवर हल्ला करताना दिसत आहे. या लष्करी कारवाईसोबतच इराणने अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणच्या नौदलाचे कमांडर, रिअर ॲडमिरल शहराम इराणी यांनी ठामपणे सांगितले की, इराणचे नौदल या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रत्येक हालचालीवर 24 तास नजर ठेवून आहे आणि ती क्षेपणास्त्र प्रणालीच्या रेंजमध्ये येताच तिचा पूर्णपणे विध्वंस केला जाईल.
अमेरिकन हालचालींवर इराणची नजर
इराणच्या नौदल प्रमुखांनी स्पष्ट केले आहे की, 'USS अब्राहम लिंकन' त्यांच्या 'ऑपरेशनल रेंज'मध्ये येण्याचीच केवळ प्रतीक्षा आहे. अमेरिकेने इराणवर लष्करी दबाव वाढवण्यासाठी या प्रदेशात अतिरिक्त सैन्य आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. याच काळात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 15-कलमी युद्धविराम प्रस्ताव मांडला असतानाच इराणने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. "आमची भूमी, सागरी क्षेत्र आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत," असे म्हणत ॲडमिरल इराणी यांनी कोणत्याही प्रकारची शत्रुत्वपूर्ण कृती खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
'आमच्या लष्करी क्षमतेला कमी लेखू नका'
इराणने अमेरिकेला त्यांच्या लष्करी सामर्थ्याचा पुनरुच्चार करताना इशारा दिला की, त्यांच्या निर्धाराल कमी लेखण्याची चूक करू नये. इराणचे नौदल अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि किनारपट्टीवरून हल्ला करणाऱ्या घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. जर अमेरिकन कॅरियर स्ट्राईक ग्रुप इराणच्या प्रादेशिक जलसीमांच्या जवळ आला, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर जीवितहानीला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला असून, इराणने यापूर्वीही अमेरिकन तळांवर हल्ल्यांचे दावे केले आहेत.
इराण कोणत्याही आव्हानासाठी सज्ज
रिअर ॲडमिरल शहराम इराणी यांनी जाहीर केले की, ज्याप्रमाणे भूतकाळात शत्रूंना सडेतोड उत्तर दिले, त्याचप्रमाणे आताही इराणचे सशस्त्र दल एकजुटीने उभे आहे. विश्लेषकांच्या मते, ट्रम्प प्रशासनाकडून होणाऱ्या लष्करी जमवाजमवीला इराणने दिलेले हे चोख प्रत्युत्तर आहे. "आमचे नौदल कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम आहे," असे म्हणत इराणने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही आक्रमक कृतीला ते 'सामर्थ्याद्वारे' प्रत्युत्तर देतील. यामुळे या प्रदेशात युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.