विशाखापट्टणम: भारतीय नौदलाच्या ताकदीत मोठी भर घालणारा अत्याधुनिक युद्धनौका INS तारागिरी आज औपचारिकरित्या सेवेत दाखल होत आहे. विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या युद्धनौकेच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता अधिक मजबूत होणार आहे.
INS तारागिरी ही पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा भाग आहे. सुमारे 6,670 टन वजनाची ही युद्धनौका देशातील अभियांत्रिकी कौशल्य आणि औद्योगिक क्षमतेचे प्रतीक मानली जाते. विशेष म्हणजे, या जहाजात 75 टक्क्यांहून अधिक साहित्य स्वदेशी आहे, जे भारताच्या संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेचे द्योतक आहे.
ही युद्धनौका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे तयार करण्यात आली आहे. नीलगिरी श्रेणी (प्रोजेक्ट 17A) अंतर्गत ही चौथी आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड निर्मित तिसरी युद्धनौका असून, 28 नोव्हेंबर 2025 रोजी ती नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली होती.
INS तारागिरीमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणालींचा समावेश आहे. यात पृष्ठभाग ते पृष्ठभागावर मारा करणाऱ्या सुपरसोनिक क्षेपणास्त्रांसह, पृष्ठभाग ते आकाशात मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. याशिवाय, पाणबुडीविरोधी प्रगत युद्ध प्रणालीही या जहाजात बसवण्यात आली आहे. या सर्व प्रणाली आधुनिक युद्ध व्यवस्थापन प्रणालीद्वारे एकमेकांशी समन्वय साधून कार्य करतात.
या युद्धनौकेची रचना ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानावर आधारित असून तिचा ‘रडार क्रॉस सेक्शन’ कमी आहे. त्यामुळे शत्रूच्या नजरेत न येता कारवाई करण्याची क्षमता या जहाजात आहे. तसेच, हे जहाज उच्च तीव्रतेच्या युद्ध मोहिमांपासून ते मानवतावादी मदत आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांसाठीही सक्षम आहे.
INS तारागिरीच्या समावेशामुळे भारतीय नौदल अधिक सक्षम आणि आधुनिक बनत आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांसाठी हा एक स्पष्ट संदेश मानला जात असून भारताची समुद्री सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.