IndiGo Flight Engine Failure: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी एका मोठ्या विमानाचा अपघात टळला. विशाखापट्टणमवरून दिल्लीच्या दिशेने झेपावलेल्या इंडिगोच्या विमानाला इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागले. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे सुरक्षित लँडिंग केल्याने मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
रनवे 28 वर सुरक्षित लँडिंग आणि हाय अलर्ट
विमान विशाखापट्टणम येथून उड्डाण केल्यानंतर दिल्लीच्या जवळ पोहोचत असतानाच वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा संशय आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तात्काळ 'एअर ट्रॅफिक कंट्रोल'शी (ATC) संपर्क साधून आपत्कालीन संदेश (Emergency Call) दिला. या माहितीनंतर विमानतळावर तात्काळ 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला. विमानाला उतरवण्यासाठी 'रनवे 28' रिकामा करून सज्ज ठेवण्यात आला होता, जिथे विमानाने यशस्वीरित्या लँडिंग केले.
अग्निशमन दलाची तत्परता आणि प्रवाशांची सुरक्षितता
दिल्ली अग्निशमन दलाला (DFS) सकाळी 10:53 वाजता या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने धावपट्टीच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी बचाव पथके सज्ज होती. सुदैवाने, विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरले असून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची पुष्टी अग्निशमन विभागाने केली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
देशातील सर्वात मोठ्या विमानसेवेचे 'ऑपरेशनल हब'
इंडिगो ही सध्या भारतातील 50 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेवर वर्चस्व असणारी सर्वात मोठी विमानसेवा आहे. 2006 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे मुख्यालय गुरुग्राम येथे असून, दिल्लीचे आयजीआय विमानतळ हे त्यांचे सर्वात मोठे कार्यकारी केंद्र (Operational Hub) आहे. कमी भाडे आणि वेळेचे काटेकोर पालन या तत्त्वांवर चालणाऱ्या या विमानसेवेसाठी आजची घटना तांत्रिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.