भारतातील रेल्वे जाळे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे व्यवस्थांपैकी एक मानले जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या रेल्वेच्या अनेक गाड्यांमध्ये राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, संपर्क क्रांती, दुरंतो आणि गरीब रथ यांसारख्या काही गाड्यांची नावे विशेष लक्ष वेधून घेतात. मात्र, या गाड्यांना ही नावे नेमकी कशी मिळाली, याची उत्सुकता अनेकांना असते. प्रत्येक नावामागे त्या सेवेचा उद्देश, प्रवासाचे स्वरूप किंवा ऐतिहासिक महत्त्व दडलेले आहे.
राजधानी एक्सप्रेसचे नाव कसे पडले?
देशाची राजधानी नवी दिल्ली आणि विविध राज्यांच्या राजधानींना जलद आणि दर्जेदार रेल्वेसेवेने जोडण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे या गाडीला 'राजधानी एक्सप्रेस' असे नाव देण्यात आले. कमी वेळेत प्रवास आणि उच्च दर्जाच्या सुविधांमुळे ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या प्रतिष्ठित सेवांपैकी एक मानली जाते.
शताब्दी एक्सप्रेसमागील इतिहास
1989 हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या विशेष रेल्वे सेवेला 'शताब्दी एक्सप्रेस' हे नाव देण्यात आले. या गाड्या प्रामुख्याने दिवसभरात प्रवास पूर्ण करणाऱ्या वेगवान सेवांसाठी प्रसिद्ध आहेत.
संपर्क क्रांती नावाचा अर्थ काय?
देशाच्या विविध भागांतील शहरांचा राजधानीशी अधिक चांगला संपर्क प्रस्थापित करण्यासाठी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. 'संपर्क' म्हणजे जोडणी, तर 'क्रांती' म्हणजे मोठा बदल. या दोन्ही संकल्पना लक्षात घेऊन या गाड्यांना 'संपर्क क्रांती एक्सप्रेस' असे नाव देण्यात आले.
दुरंतो एक्सप्रेस का म्हणतात?
'दुरंतो' हा बंगाली भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ 'न थांबणारा' किंवा 'अखंड वेगाने धावणारा' असा होतो. या गाड्या प्रवासादरम्यान अत्यल्प स्थानकांवर थांबतात आणि लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळेत पूर्ण करतात. म्हणूनच या सेवेचे नाव 'दुरंतो एक्सप्रेस' ठेवण्यात आले.
गाड्यांची नावे ठरवण्यामागील निकष
भारतीय रेल्वेमध्ये अनेक गाड्यांना त्यांच्या सुरुवातीच्या आणि अंतिम स्थानकांवरून नावे दिली जातात. मात्र काही विशेष गाड्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेमुळे, ऐतिहासिक घटनांमुळे, सांस्कृतिक वारशामुळे किंवा एखाद्या प्रदेशाशी असलेल्या संबंधामुळे निश्चित केली जातात. त्यामुळे प्रत्येक रेल्वेच्या नावामागे एक विशिष्ट उद्देश आणि वेगळी ओळख दडलेली असते.