नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर टॅरिफचा मारा करत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला, तरी भारताने आता एक असा डाव टाकला आहे, ज्यामुळे अमेरिकेला राजनैतिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर धक्का बसल्याचं स्पष्ट दिसत आहे. रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. या टॅरिफचा भारताच्या जीडीपी आणि निर्यातीवर नकारात्मक परिणाम होईल, असे अमेरिकेकडून चित्र रंगवलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात भारताने अमेरिकेच्या अपेक्षांना तडा देत निर्यातीमध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली.
भारताची निर्यात मागील वर्षांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत असून, जागतिक बाजारात भारताचं स्थान अधिक मजबूत होत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाचा फटका आपल्याला बसू नये म्हणून भारताने विविध देशांशी व्यापार चर्चांना वेग दिला. याच रणनीतीचा भाग म्हणून सरकारने काही महत्त्वाचे पाऊले उचलली आणि याला भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून पाहिलं जात आहे. दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात मोठ्या व्यापारी कराराची चर्चा सुरू आहे. हा करार झाला तर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याची शक्यता निर्माण होते. परंतु केवळ अमेरिकेवर अवलंबून न राहता भारताने आशियाई आणि युरोपियन बाजारपेठांकडेही यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. याच दिशेने भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चिनी पर्यटकांसाठी व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा.
जुलै 2020 नंतर प्रथमच भारताने चीनी नागरिकांना पर्यटक व्हिसा देण्यास परवानगी दिली आहे. पूर्व लडाखमधील तणावानंतर थंडावलेल्या द्विपक्षीय संबंधांना सुधारण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. जगभरातील चीनी नागरिकांना भारतीय दूतावासातून पर्यटन व्हिसासाठी अर्ज करण्याची सुविधा पुन्हा मिळाल्याने चीनसोबतचे संबंध सुधारण्याचा मार्ग मोकळा होत आहे. या निर्णयामुळे भारत आणि चीन व्यापारसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे भारताची हा पुढाकार अमेरिकेला स्पष्ट संदेश देणारी आहे, दबावाच्या राजकारणाने भारत मागे हटत नाही; भारत स्वतःचे जागतिक समीकरण स्वतः ठरवतो.
अमेरिकेला भारत – चीन जवळीक पसंत नसल्याचं अनेक वेळा दिसून आलं आहे. पण भारताने घेतलेले अलीकडचे निर्णय सूचित करतात की, जागतिक राजकारणात भारत स्वतःच्या हिताला प्राधान्य देत स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका बजावत आहे. जगातील सर्वात जलद वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याने भारताचे पर्याय आता अधिक विस्तारले आहेत. अमेरिकेने दडपण आणण्याचा प्रयत्न केला, तर भारत नवीन भागीदारी उभी करून परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याची क्षमता ठेवतो हे याचं हे ताजं उदाहरण. एकूणच, अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमधून भारत अधिक मजबूत बनत असून, देशाची जागतिक राजकीय आणि आर्थिक ताकद नव्याने अधोरेखित होत आहे.