भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. कारण जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा २४ टक्के वाटा आहे. जागतिक दूध उत्पादनात २०२१-२२ मध्ये जागतिक पातळीवरी भारत हा प्रथम स्थानी आहे. वर्ष २०१४-१५ ते २०२१-२२ अशा गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत, भारतातील दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर वर्ष २०२१-२२ मध्ये देशातील दूध उत्पादन २२ कोटी टनांपर्यंत वाढल्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यावेळी म्हणाले. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे.
भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असा आहे. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगांचे एक आदर्श उदाहरण ठरु शकेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते. भारताच्या दुग्ध विकास क्षेत्राचे खरे नेतृत्व महिलाच करत आहेत. कारण दुग्ध विकासात महिलांचे ७० टक्के प्रतिनिधित्व असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते.
भारतात उत्तर प्रदेश हे राज्य दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थान दूध उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थाननंतर दूध उत्पादनात मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात चौथ्या क्रमांकावर तर आंध्र प्रदेश पाचवा क्रमांक आणि पंजाब दूध उत्पादनात सहाव्या क्रमांकावर असल्याची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने दिली आहे.