नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफीची तरतूद करण्यात आली आहे. पगारदार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 75 हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनमुळे ही मर्यादा 12.75 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. त्यामुळे अनेकांना या मर्यादेपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही, असे वाटते. मात्र, प्रत्यक्षात काही प्रकारच्या उत्पन्नावर या सवलतीचा लाभ मिळत नसल्याने कर भरावा लागू शकतो.
'या' उत्पन्नावर करसवलत लागू नाही
आयकर कायद्यातील कलम 87A अंतर्गत मिळणारी रिबेट ही फक्त सामान्य करस्लॅबनुसार करपात्र असलेल्या उत्पन्नासाठी आहे. विशेष करदर (Special Rate) लागू असलेल्या उत्पन्नावर ही सूट मिळत नाही. त्यामुळे पगार 12.75 लाख रुपयांपेक्षा कमी असला, तरी अशा उत्पन्नामुळे कर द्यावा लागू शकतो.
कोणत्या उत्पन्नावर लागू होतो कर?
शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा मालमत्ता विक्रीतून मिळालेला कॅपिटल गेन
क्रिप्टोकरन्सी किंवा इतर व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्समधील नफा
लॉटरी किंवा घोड्यांच्या शर्यतीतील बक्षीस
ऑनलाइन गेमिंगमधून मिळालेली रक्कम
या सर्व उत्पन्नावर विशेष करदर लागू असल्याने 87A अंतर्गत मिळणाऱ्या रिबेटचा लाभ मिळत नाही.
पगारावरील TDS शून्य असला तरी कर लागू शकतो
काही कर्मचाऱ्यांच्या पगारातून TDS कापला जात नसला तरी त्याचा अर्थ कर भरावा लागणार नाही, असा होत नाही. कारण आयकराची अंतिम गणना ही एकूण वार्षिक उत्पन्नावर केली जाते. FD वरील व्याज, बचत खात्यावरील व्याज, भाडे किंवा इतर कोणतेही अतिरिक्त उत्पन्न असल्यास ITR भरताना कराची रक्कम समोर येऊ शकते.
ITR दाखल करणे आवश्यक
12.75 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर करसवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर आयकर विवरणपत्र (ITR) वेळेत दाखल करणे गरजेचे आहे. तसेच विशेष करदराच्या उत्पन्नाची माहितीही अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे. अन्यथा आयकर विभागाकडून कराची मागणी किंवा नोटीस येऊ शकते.