गेल्या काही दिवसांपासून, कॉमेडियन प्रणित मोरेच्या प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या कार्यक्रमांबद्दलची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. नुकताच स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ज्यात हिमांशू जांग्रा नावाच्या एका तरुणाने त्यांच्या जोडीदाराला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली आणि 370 रुपयांच्या बिर्याणीवरून अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केलं.
यात त्याने त्याच्या जोडीदाराकडून अपेक्षा केली की त्याने तिच्यावर 370 रुपयांचा खर्च केला आहे, तर तो ते पैसे वसूल करण्यासाठी तिच्या संमतीशिवाय तिच्यासोबत काहीही वागू शकतो. या त्याच्या विधानाने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तसेच 23 वर्षीय हिमांशुला नोकरी गमवावी लागली आहे. इतकचं नव्हे तर पोलीस आणि महिला आयोगाकडून त्याला कायदेशीर नोटीस आली आहे. चहूबाजूंनी कोंडी झाल्यानंतर आता हिमांशू आता प्रचंड घाबरला आहे. तसेच त्याने केलेल्या वक्तव्यावर पश्चात्ताप व्यक्त करत मौन सोडले आहे.
हिमांशूने त्याची जुनी कंपनी ‘स्टारव्हिक डिझाईन’चे मालक विवेक विश्वकर्मा यांच्यासोबतचा एक व्हिडिओ कॉल शेअर केला. यावेळी तो म्हणाला की, “मी त्या शोमध्ये ज्या मुलीबद्दल बोललो, ती माझी मैत्रीण होती आणि आम्ही एकमेकांना डेट करत होतो. आमचं बाँडिंग खूप चांगलं होतं. पण स्टेजवर जाऊन मी जे काही बोललो, ते संपूर्ण खरं नव्हतं. माझ्या आधी तिथे जे लोक बोलत होते, त्यांनीही अशाच मसालेदार गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी मी ती गोष्ट अतिशय रंगवून आणि खोटी सांगितली. माझं नशीबच खराब होतं की फक्त माझाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मी अडकलो.”
“सध्या माझ्यावर गुन्हा दाखल झालाय आणि माझी अवस्था खूप वाईट झाली आहे. मी भयानक मानसिक तणावाखाली जगत आहे. जेव्हा मी माझ्या घरच्यांच्या चेहऱ्याकडे बघतो, तेव्हा ‘मी त्या शोमध्ये का गेलो?’ असा विचार करून माझे डोळे भरून येतात. मी खूप चुकीचे शब्द वापरले, हे मला मान्य आहे आणि त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. माझा हेतू कोणाचा अपमान करण्याचा नव्हता. माझ्या ऑफिसमधील महिला सहकाऱ्यांशी मी नेहमीच आदराने वागलो आहे.”