Ganesh Visarjan Tragedy: गणेश विसर्जनादरम्यान काळीज पिळवटणारी दुर्घटना; तलावात बुडून 6 चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

संगारेड्डी जिल्ह्यातील पेड्डाकंजेर्ला गावाजवळ असलेल्या नेरेडू चेरुवू या तलावात श्रींचे विसर्जन करताना 6 लहान मुलांचा पाण्यात बुडून जागीच अंत झाला.

Ganesh Visarjan Tragedy: गणेश विसर्जनादरम्यान काळीज पिळवटणारी दुर्घटना; तलावात बुडून 6 चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

Ganesh Visarjan Tragedy: गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप देत असताना तेलंगणातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. संगारेड्डी जिल्ह्यातील पेड्डाकंजेर्ला गावाजवळ असलेल्या नेरेडू चेरुवू या तलावात श्रींचे विसर्जन करताना 6 लहान मुलांचा पाण्यात बुडून जागीच अंत झाला. 3 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी ही मुले स्थानिक तलावावर गेली होती. मात्र, पाण्याच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्यामुळे आणि पोहता येत नसल्याने ही बालके खोल पाण्यात ओढली गेली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

गावकऱ्यांचे बचावकार्य ठरले अपुरे

मिळालेल्या माहितीनुसार, प्राण गमवावी लागलेली ही सहाही मुले शिरीषा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एका स्थानिक शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत होती. विसर्जनाच्या वेळी अचानक काही मुलांचा तोल गेला आणि ती गटांगळ्या खाऊ लागली. त्यांना वाचवण्यासाठी इतर सहकाऱ्यांनी प्रयत्न केले, परंतु पाण्याच्या तीव्र ओघामुळे आणि खोलीमुळे 6 जण एकापाठोपाठ एक बुडाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी तत्काळ तलावात उड्या मारून मुलांना बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता. एकाच वेळी 6 निष्पाप जिवांचा बळी गेल्याने पीडित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा – Crime News: वडिलांना वाचवायला धावली अन् जिवाला मुकली; जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी बाप-लेकीला संपवलं

पोलीस आणि प्रशासनाकडून चौकशी सुरू 

घटनेची माहिती मिळताच संगारेड्डी पोलीस दल आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तलावाच्या परिसरातून मृतदेह बाहेर काढून ते पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. तलावावर विसर्जनादरम्यान सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या की नाही, तसेच ही मुले कोणाच्या देखरेखीखाली विसर्जनासाठी गेली होती, या सर्व बाबींचा पोलीस प्रशासन गांभीर्याने तपास करत आहे. बाप्पाला निरोप देताना घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तेलंगणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number