Viral Story: जींद जिल्ह्यातील उचाना परिसरातून एक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तब्बल अकराव्यांदा प्रसूती केली असून, पहिल्या दहा प्रसूतींमध्ये मुली झाल्यानंतर अखेर अकराव्या वेळी तिला मुलगा झाला आहे. मुलाच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंबाने जल्लोष साजरा केला, मात्र या घटनेने समाजातील मुलासाठी असलेली मानसिकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या महिलेला आधी दहा मुली आहेत. त्यानंतरही मुलाची इच्छा कायम राहिल्याने अकरावी प्रसूती करण्यात आली. ही डिलिव्हरी खासगी रुग्णालयात नॉर्मल पद्धतीने झाली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, महिलेमध्ये रक्ताची पातळी कमी असल्याने प्रसूती जोखमीची होती, तरीही सुदैवाने आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.
हेही वाचा:Viral Video : चांगलीच जिरली! घरातील एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकला चोर; व्हिडिओ तुफान व्हायरल
महिलेच्या पतीने सांगितले की, त्यांचा विवाह सुमारे 19 वर्षांपूर्वी झाला. या काळात कुटुंब मोठं झालं असून, मोठी मुलगी सध्या बारावीत शिक्षण घेत आहे. मुलाच्या जन्मानंतर आनंद व्यक्त करताना वडिलांना आपल्या दहा मुलींची नावं सांगायला सांगितली असता, ते काही नावं विसरल्याचं दिसून आलं. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या प्रसंगानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात लाडू वाटून आणि फुगे लावून आनंद साजरा केला. वडिलांनी सांगितले की, मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. प्रसूतीसाठी पत्नीला रुग्णालयात नेताना मनात भीती होती, हृदय जोरात धडधडत होतं, असंही त्यांनी सांगितलं. मात्र मुलगा जन्माला आल्यानंतर सर्व तणाव नाहीसा झाल्याचं त्यांनी म्हटलं.
विशेष म्हणजे, घरातील मुलींनीही “भाऊ घेऊन या” असं वडिलांना सांगितल्याचं त्यांनी सांगितलं. शेजाऱ्यांनीसुद्धा आनंदात डीजे लावण्याची तयारी दर्शवली होती. मात्र या सगळ्या उत्सवामागे समाजातील मुलगा-मुलगी भेदभावाचा मुद्दा पुन्हा समोर येतो आहे.
आईनेही प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रसूतीपूर्वी तिला खूप घबराट होती, मात्र कुटुंबीयांनी कोणताही दबाव टाकला नाही. “आता देवाची मर्जी पूर्ण झाली,” असं म्हणत तिने समाधान व्यक्त केलं. ती आपल्या सर्व मुलींचं संगोपन करत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
ही घटना आनंदाची असली तरी ती समाजाला एक प्रश्न विचारते मुलगा झाला म्हणूनच जल्लोष आणि मुली झाल्या तेव्हा शांतता, ही मानसिकता अजूनही बदलली का? शासन आणि समाज मुलींच्या सशक्तीकरणावर भर देत असताना, अशा घटना वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या ठरतात.