Atal Tunnel Accident: हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध ‘अटल बोगद्या’च्या उत्तर प्रवेशद्वाराजवळ एक अत्यंत थरारक आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. बोगद्यातून बाहेर पडताना एका भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्या कडेचे सुरक्षा कठडे (barricades) तोडून थेट खाली बियास नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या लोखंडी सळईंवर जाऊन अडकली. या भीषण दुर्घटनेत एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला असून, अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा वेग इतका प्रचंड होता की, बांधकामाच्या लोखंडी सळई कारच्या आरपार घुसल्या, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ अंगावर काटा आणणारे आहेत.
उत्तर प्रदेश आणि राजस्थानचे पर्यटक जखमी; बचावकार्यात अडचणी
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख राजस्थानचे रहिवासी असलेले 34 वर्षीय कैलास यांच्या रूपात झाली असून, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व पर्यटक मनालीहून लाहौलच्या दिशेने प्रवास करत होते. जखमींमध्ये उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील आदित्य आणि राजस्थानच्या सीकर येथील सिद्धार्थ सिंग शेखावत यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे. कार अतिशय बिकट ठिकाणी आणि लोखंडी सळईंमध्ये अडकल्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाला जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
आज का अटल टनल एक्सीडेंट बस सब ठीक ठाक हो भगवान की कृपा से ? कृपया गाड़ी ध्यान से चलाये ? pic.twitter.com/gfxwqWoQ2E — Sandeep Thakur (@thakurbjpdelhi) July 1, 2026
प्रशासनाच्या वेगमर्यादेच्या नियमांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष
अटल बोगदा परिसरात पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी डोंगराळ भागात सुरक्षित प्रवासासाठी वेगमर्यादेचे नियम निश्चित केले आहेत. तसेच चालकांसाठी वारंवार सतर्कतेच्या सूचनाही जारी केल्या जातात. मात्र, या चेतावणीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने आणि निष्काळजीपणे गाड्या चालवण्याच्या प्रवृत्तीमुळेच अशा प्राणघातक दुर्घटना घडत असल्याचे समोर येत आहे. पोलीस सध्या या अपघाताचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.