मुंबई: मराठी संगीतविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेलं संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं आता बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालं आहे. सोशल मीडियावर कोट्यवधी व्ह्यूज मिळवणाऱ्या या गाण्याचं नव्या अंदाजातील व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याची पहिली झलक सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
‘धमाल’ फ्रँचायझीच्या आगामी चौथ्या भागासाठी ‘गुलाबी साडी’ गाण्याला नव्या रूपात सादर करण्यात आलं आहे. या नव्या गाण्याला ‘साडी’ असं नाव देण्यात आलं असून, त्यामध्ये बॉलिवूडचा खास तडका देण्यात आला आहे. गाण्याचा टीझर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
या नव्या व्हर्जनमध्ये बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री ईशा गुप्ता, अंजली आनंद आणि गाण्याचा मूळ गायक संजू राठोडही झळकणार आहे. टीझरमध्ये सर्व कलाकार ‘गुलाबी साडी’च्या तालावर थिरकताना दिसत असून, त्यांच्या एनर्जेटिक डान्सने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
या गाण्याचं संगीत प्रसिद्ध संगीतकार तनिष्क बागची यांनी नव्या ढंगात सादर केलं आहे. तर गाण्याचे नवे बोल गीतकार कुमार यांनी लिहिले आहेत. मूळ गाण्याची लोकप्रियता कायम ठेवत त्याला बॉलिवूडची झलक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संजू राठोड यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. “तयार राहा… तुमचा आवडता गुलाबी रंग पुन्हा एकदा सोशल मीडियावर राज्य करायला येतोय,” अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. टीझर शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
‘गुलाबी साडी’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून अनेक सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि चाहत्यांनी या गाण्यावर रील्स तयार केल्या होत्या. मराठी गाण्याने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं हे यश विशेष मानलं जातं. आता त्याच गाण्याचं बॉलिवूड व्हर्जन येत असल्याने गाण्याची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या गाण्याचा अधिकृत व्हिडिओ २७ जून रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.