मुंबई: युद्धाची ठिणगी पडली की जागतिक अर्थव्यवस्थेचा श्वास काही काळ कोंडतो, पण याच कोंडीत सोने-चांदीच्या बाजारात मात्र कमालीची उलथापालथ पाहायला मिळते. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक सराफा बाजारात सध्या 'कधी वाढ, कधी घसरण' असाच काहीसा खेळ सुरू आहे. अमेरिकेने येत्या 6 एप्रिलपर्यंत इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर कोणताही हल्ला करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, शांततेच्या या तात्पुरत्या आश्वासनाने बाजाराचे चित्रच पालटून टाकले आहे. कालपर्यंत घसरणीच्या गर्तेत अडकलेले सोने आज पुन्हा एकदा उसळी घेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे.
युद्धाच्या सुरुवातीच्या काळात जागतिक अस्थिरतेच्या भीतीने सोन्याच्या दरांनी अक्षरशः ऐतिहासिक उसळी घेतली होती. पाहता पाहता सोन्याचा भाव दोन लाखांच्या टप्प्याजवळ पोहोचला होता. मात्र, जसजशा आंतरराष्ट्रीय घडामोडी बदलल्या, तसतशी या पिवळ्या धातूची चमक काहीशी फिकी पडली आणि 22 कॅरेट सोन्याचे दर थेट 1 लाख 28 हजारांपर्यंत खाली आले.
सलग दोन दिवस होत असलेल्या या घसरणीमुळे सोने आता स्वस्तच राहील आणि जोपर्यंत युद्ध थांबणार नाही तोपर्यंत दरात वाढ होणार नाही, असा अंदाज बाजार तज्ज्ञांकडून वर्तवला जात होता. पण, अमेरिकेच्या एका घोषणेने बाजाराचे सर्व अंदाज पार चुकीचे ठरवले आहेत.
आज, 27 मार्च 2026 रोजी सराफा बाजाराने पुन्हा एकदा कात टाकल्याचे चित्र आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या दरात 1200 रुपयांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, प्रति 10 ग्रॅमचा भाव 1,40,780 रुपयांवर पोहोचला आहे. काल, 26 मार्च रोजी जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 1 लाख 47 हजार 290 रुपये मोजावे लागत होते.
आज त्यात थेट 1200 रुपयांची भर पडल्याने सोने पुन्हा एकदा महागले आहे. असे असले तरी, एक दिलासादायक बाब म्हणजे, सोने अजूनही दोन लाखांच्या सर्वोच्च उच्चांकावरून बऱ्यापैकी स्वस्तच मिळत आहे.
सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही रुबाब दाखवण्यास सुरुवात केली आहे. एमसीएक्सवर (MCX) आज सकाळी झालेल्या व्यवहारानुसार, चांदीच्या दरानेही मोठी झेप घेतली. चांदीचा नवीन दर प्रति किलोग्रॅमसाठी तब्बल 2,24,120 रुपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत आज सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार मुसंडी मारल्यामुळे, गुंतवणुकीसाठी योग्य संधी शोधणाऱ्या ग्राहकांमध्ये आता खरेदी करावी की थांबावे, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
एकीकडे इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली सराफा बाजारात तेजी परतत असताना, दुसरीकडे मात्र भारतीय शेअर बाजाराला या भू-राजकीय तणावाचा मोठा फटका बसत आहे. शेअर मार्केटमध्ये आज मोठी पडझड पाहायला मिळाली असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये धोक्यात आले आहेत. युद्धाच्या या अनिश्चिततेमुळे आगामी काळातही शेअर बाजार आणि सराफा बाजारातील हा खेळ असाच सुरू राहण्याची दाट शक्यता आहे. जागतिक राजकारणातील प्रत्येक घडामोड आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर आणि गुंतवणुकीवर परिणाम करत असल्याचे यातून स्पष्ट होते.