Gold Silver Rate Today: एका दिवसाच्या विश्रांतीनंतर सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी; काय आहेत आजचे दर?

सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वाढलेला कल यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.

Gold Silver Rate Today: एका दिवसाच्या विश्रांतीनंतर सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी; काय आहेत आजचे दर?

मुंबई: पिवळ्या धातूची भुरळ भारतीयांना नवीन नाही; सण-समारंभ असो वा लग्नसराई, सोन्याची खरेदी हा आपल्या संस्कृतीचा आणि गुंतवणुकीचा एक अविभाज्य भाग मानला जातो. मात्र, सध्या सराफा बाजारात जो आलेख पाहायला मिळत आहे, तो पाहता सर्वसामान्यांना सोन्याच्या दुकानात पाऊल ठेवण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक पातळीवरील कमालीची अस्थिरता यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंचे दर एका अनाकलनीय स्तरावर स्वार झाले आहेत. या जागतिक घडामोडींचे थेट पडसाद देशांतर्गत बाजारातही उमटत असून, सोने-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सुरू असलेला दरांचा लपाछपीचा खेळ शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी एका नव्या वळणावर पोहोचला. शुक्रवारी नोंदवल्या गेलेल्या एका दिवसाच्या घसरणीनंतर, आज देशात सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा 'यू-टर्न' घेत ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,777.17 डॉलरवर पोहोचल्याने, भारतीय बाजारात त्याचे थेट परिणाम दिसून आले आहेत. जागतिक अशांततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांचा कल वाढल्यानेच या मौल्यवान धातूच्या किमतीत ही वाढ नोंदवली गेली असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा: Ashok Kharat Case: 'माझं मरण इथेच…'; भोंदू बाबाच्या पापाचा घडा भरला, चौकशीत उत्तरं देताना अक्षरश: नाकीनऊ

आजच्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 52 हजार 510 रुपयांवर पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 39 हजार 810 रुपये मोजावे लागत आहेत. आदल्या दिवशी याच दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार 300 रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला होता. दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधानी मुंबई, तसेच पुणे, बंगळुरू आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 52 हजार 360 रुपये आणि 22 कॅरेटचा दर 1 लाख 39 हजार 660 रुपयांवर स्थिरावला आहे. चेन्नईमध्ये मात्र हाच दर सर्वाधिक म्हणजे 24 कॅरेटसाठी 1 लाख 54 हजार 100 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही आज सराफा बाजारात आपली चमक दाखवली आहे. शनिवारी सकाळी चांदीचा दर प्रति किलोग्रॅम 2 लाख 60 हजार 100 रुपयांपर्यंत भडकला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 75.91 डॉलर इतका नोंदवला गेला असून, त्याचा थेट परिणाम देशांतर्गत किमतींवर झाला आहे. आदल्या दिवशी दिल्लीच्या बाजारात चांदीचा दर 3800 रुपयांनी वधारून 2 लाख 47 हजार रुपयांवर पोहोचला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीने चार लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. त्या तुलनेत सध्याचे दर कमी वाटत असले, तरी ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याचे चित्र आहे.

एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतल्यास, जोपर्यंत जागतिक पातळीवरील भूराजकीय तणाव निवळत नाही आणि आंतरराष्ट्रीय अर्थचक्र पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत मौल्यवान धातूंच्या दरातील हा भडका पूर्णपणे शांत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. बदलत्या अर्थकारणात सोन्याकडे केवळ अलंकार म्हणून न पाहता एक भक्कम आर्थिक आधार म्हणून पाहिले जात असल्याने, गुंतवणूकदार आणि सामान्य खरेदीदारांच्या नजरा आता आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडीवर खिळलेल्या असणार आहेत. 

हेही वाचा: Ashok Kharat Case: सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकर यांच्याकडून धोका?; बीडमधील 'त्या' फोन कॉलने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number