Gold Rate Prediction : लग्नसराईत सोनं खरेदीची चिंता सतावतेय तर निर्धास्त व्हा! रशियाच्या एका निर्णयाने उतरणार सोन्याची झळाळी, दर येणार एक लाखांपर्यंत?

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात आणि एक लाखापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Gold Rate Prediction : लग्नसराईत सोनं खरेदीची चिंता सतावतेय तर निर्धास्त व्हा! रशियाच्या एका निर्णयाने उतरणार सोन्याची झळाळी, दर येणार एक लाखांपर्यंत?

मुंबई: ‘आकाशाला गवसणी घालणारे सोन्याचे भाव आता जमिनीवर येऊ पाहत आहेत,’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या दराने 1,80,779 रुपये प्रति 10 ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठून गुंतवणूकदारांचे डोळे दिपवले होते. मात्र, अवघ्या महिन्याभरातच हे चित्र पालटले आहे. सोन्याच्या दरात सध्या मोठी पडझड पाहायला मिळत असून, तज्ज्ञांच्या मते ही तर केवळ सुरुवातीची झलक असू शकते. सोन्याचे दर चक्क एक लाख रुपयांच्याही खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावात झालेली घसरण चक्रावून टाकणारी आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सोन्याचा भाव 1,56,200 रुपयांपर्यंत खाली आला, जो जानेवारीतील उच्चांकापेक्षा तब्बल 24,500 रुपयांनी कमी आहे. या घसरणीचे सत्र सोमवारी, 16 फेब्रुवारी रोजी देखील सुरूच राहिले. एमसीएक्सवर (MCX) सोने 0.61 टक्क्यांनी घसरून 1,54,937 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. एका महिन्यात इतकी मोठी तफावत दिसणे हे बाजारातील अनिश्चिततेचे लक्षण मानले जात आहे.

सोने बाजार तज्ज्ञ अमित गोयल यांनी वर्तवलेला अंदाज गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घालणारा आहे. त्यांच्या मते, “सोन्याने सर्वोच्च बिंदू (Peak) गाठला असून, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे.” भारतात सोन्याचे दर आधीच 15 टक्क्यांनी पडले आहेत. गोयल यांच्या मते, आगामी काळात भारतात सोने एक लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्याही खाली येऊ शकते, तर आंतरराष्ट्रीय बाजारात ते 3,000 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: Pune Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर अधिकाऱ्यांचा बोगस कारभार, दुखवटा जाहीर झाल्यानंतरही अनेक शांळांना प्रमाणपत्र वाटप

या अनपेक्षित घसरणीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडले गेले आहेत. काही अहवालांनुसार, रशियाने आर्थिक धोरणात मोठा बदल करण्याचे संकेत दिले असून, ते अमेरिकेसोबत पुन्हा डॉलरमध्ये व्यापार करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहेत. रशियाने दीर्घकाळापासून ‘डी-डॉलरायझेशन’ मोहीम राबवत डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रशियाच्या या यू-टर्नमुळे (U-turn) सोन्याला जबर फटका बसू शकतो. रशियाने यावर अधिकृत भाष्य केले नसले तरी, बाजारातील मोठ्या खरेदीदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे.

याचा थेट परिणाम ‘ब्रिक्स’ (BRICS) देशांच्या महत्त्वाकांक्षेवर होण्याची शक्यता आहे. अनेक देशांनी डॉलरला शह देण्यासाठी सोन्याला व्यापाराचे माध्यम बनवण्याचे ठरवले होते. यासाठी या देशांनी गेल्या काही वर्षांत सोन्याची आक्रमक खरेदी केली होती. जागतिक सुवर्ण उत्पादनात 50 टक्के हिस्सा असलेल्या ब्रिक्स समूहातील प्रमुख देशच जर डॉलरकडे वळला, तर सोन्याची मागणी घटणे अपरिहार्य आहे आणि त्याचेच पडसाद आता किमतींवर उमटत आहेत.

सध्या सोन्याच्या दरात जी काही थोडीफार वाढ दिसेल, ती केवळ क्षणिक असू शकते, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही मोठ्या घसरणीपूर्वीची एक फसवी आणि तात्पुरती तेजी असू शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा सावधगिरीचा इशारा आहे. मात्र, जर तज्ज्ञांचा हा अंदाज खरा ठरला, तर ऐन लग्नसराईच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो.

हेही वाचा: Uday Samant On Ganesh Naik: "गणेश नाईकांच्या वयाचा आदर, अन्यथा मराठी भाषेत उत्तर देऊ" मंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईकांना सुनावले खडेबोल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number