Gold-Silver Rate:पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता जागतिक आर्थिक बाजारपेठांवर दिसू लागला आहे. विशेषतः सोने आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि त्यावेळी सर्वात आधी आठवण होते ती सोन्याची. सध्या नेमकी हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांत सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर अनेक शहरांत 1.70 लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली असून ग्राहकांना खरेदी करताना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,70,170 रुपयांवर पोहोचला आहे, तर 22 कॅरेटचा दर 1,56,000 रुपयांच्या आसपास आहे. मुंबईतही जवळपास हेच दर असून 24 कॅरेटसाठी 1,70,020 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये दर आणखी थोडे जास्त असून 24 कॅरेट सोनं 1,70,730 रुपयांपर्यंत गेले आहे. कोलकाता, अहमदाबाद, लखनऊ आणि हैदराबादमध्येही दरांमध्ये फारसा फरक नसला तरी सर्वत्र वाढीचा कल कायम आहे.
चांदीच्या किमतीतही जोरदार वाढ झाली आहे. काही बाजारांत चांदीने ऐतिहासिक पातळी गाठल्याचे चित्र आहे. औद्योगिक वापर आणि सुरक्षित गुंतवणूक या दोन्ही कारणांमुळे चांदीची मागणी वाढली आहे. परिणामी, दोन्ही मौल्यवान धातूंना बाजारात मजबूत आधार मिळत आहे.
तज्ञांच्या मते, इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. शेअर बाजारातील चढउतार आणि चलनवाढीची भीती यामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. अशा वेळी सोने हे नेहमीच विश्वासार्ह पर्याय मानले जाते. त्यामुळे मागणी वाढल्याने दरही झपाट्याने वाढत आहेत.
आगामी काळात परिस्थिती कशी बदलते यावर सोन्या-चांदीच्या किमतींचे चित्र अवलंबून असेल. जर तणाव कायम राहिला तर दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र गुंतवणूक करताना बाजारातील अस्थिरता लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञ सुचवत आहेत.
सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही वाढ चिंतेची बाब ठरू शकते. अनेकजण दर आणखी वाढण्याच्या भीतीने आताच खरेदी करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत बाजारात आणखी हालचाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.